जेरुसलेम : वृत्तसंस्था – गाझा पट्टीवर हजारोंच्या संख्येने पॅलेस्टिनी नागरिकांनी रिटर्न टू लॅन्ड शांतता मार्च काढला होता. यावेळी इस्रायली सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या बेछूट गोळीबारात किमान 16 जण ठार झाले. तर सुमारे 1500 आंदोलक जखमी झाले. मृत आणि जखमी पॅलेस्टिनी आहेत. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्रने शांततेचे आवाहन करत तातडीची बैठक बोलाविली आहे.
पेट्रोल बॉम्ब फेकले
इस्रायली सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लॅन्ड डेनिमित्त जवळपास 17 हजार पॅलेस्टिनींनी मार्च काढला होता. हा मार्च सीमेच्या अगदी जवळ होता. त्याच ठिकाणी इस्रायली सैनिकांच्या चेक पोस्ट होत्या. सैनिकांनी आंदोलकांना दूर होण्याचे आवाहन केले. पण, काही युवा पॅलेस्टिनींनी मुद्दाम चेक पोस्टवर गोंधळ घालू लागले. काहींनी पेट्रोल बॉम्बदेखील भिरकावले. तेव्हा इस्रायली सैनिकांनी सर्वांवर फायरिंग सुरू केली.
सीमा ओलांडण्याचा प्रयत्न
यासंदर्भात इस्रायली माध्यमांनी म्हंटले आहे की, काही पॅलेस्टिनी आंदोलक मार्च सोडून सीमा ओलांडण्याचा आणि घुसखोरीचा प्रयत्न करत होते. यानंतर इस्रायली सैनिकांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सीमेवर चक्क रणगाडे, शार्प शूटर स्नाइपर्स आणि अतिरिक्त सैनिक बोलावले. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचे बॉम्ब फेकण्यासाठी ड्रोन विमानांची मदत घेतली. इस्रायलच्या सैनिकांनी या हिंसाचारासाठी पूर्णपणे पॅलेस्टिनी नागरिकांना आणि तेथील प्रतिबंधित सशस्त्र संघटना हमासला जबाबदार धरले आहे.
30 मार्च पॅलेस्टाईनमध्ये जमीन दिवस
इस्रायल आणि गाझा सीमेवर पॅलेस्टिनी आंदोलकांनी 5 कॅम्प तयार केले आहेत. त्यांच्या मार्चला ग्रेट मार्च ऑफ रिटर्न असे नाव देण्यात आले आहे. हे आंदोलन 3 आठवड्यांपर्यंत चालणार असे नियोजन आहे. 30 मार्च पॅलेस्टाईनमध्ये जमीन दिवस म्हणून साजरा केला जातो. 1976 मध्ये याच दिवशी इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांना ठार मारून मोठा भूखंड काबिज केला. या आंदोलनात ते स्वतःची जमीन सोडून गेलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना परत येण्याचे आवाहन करत आहेत. 15 मे 1948 रोजीच विविध देशांतून पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या ज्यूंनी इस्रायलची स्थापना केली. तसेच आपल्या हद्दीत राहणार्या हजारो पॅलेस्टिनींना घरे सोडण्यास भाग पाडले होते. मुळात त्यांनाच परत बोलावण्यासाठी हे आंदोलन आहे.