देशात सध्या राष्ट्रपती निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची धावपळ सुरू असल्याचे दिसते. उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता कालपरवापर्यंत शमली असली तरी जातीच्या मुद्द्यावरून नवी चर्चा मात्र जोरात सुरू आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैरोजी संपत असल्याने आता ही निवडणूक होत आहे. आतातर उमेदवारही जाहिर झाले आहेत. त्यामुळे प्रचारासाठी राजकीय पक्ष सरसावल्याचे दिसतात. 17 जुलै रोजी निवडणुक तर मतमोजणी 20 जुलैरोजी होईल. मंगळवारी 28 जणांनी राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यातील 7 अर्ज त्याचवेळी रद्द झालेत. आतापर्यंत 47 अर्ज आले असून 28 जूनपर्यंत किती अर्ज दाखल होतील, हे पाहवे लागेल. देशाचे नवे राष्ट्रपती कोण असतील? हे 20 जुलै रोजी समजेल. देशातील सर्वोच्च पदी कोविंद की मीरा कुमार, याकडे सर्वांच्या नजरा दिसून येतात.
एनडीएकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. त्यातच उमेदवार हिंदुत्ववादी असावा, असा सूर लावत शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचा खडा फेकून स्वत:चे हसे करून घेतले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेवार सुचविताना जे निकष शिवसेना लावते; तेच राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी शिवसेनेने लावले की काय? अशी शंकाच येत होती. शिवसेनेचे जावू द्या; कारण या पक्षाचे नेतृत्व जे बोलते ते फार काही मनावर घ्यायचे नसते, असे भाजपसह सर्वांनीच ठरविल्यासारखीच स्थिती आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका राष्ट्रपतिपदासाठी घेतली; ती नक्कीच न पटणारी होती. मोदींनी रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहिर करून 2019च्या निवडणुकीसाठी ममास्टरस्ट्रोकफच मारला, अशी चर्चा झडली. मास्टरस्ट्रोक शब्द प्रसिध्दी माध्यमांनीच योजला ही बाब आणखी क्लेशदायक होती. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही दलित उमेदवार दिला म्हणजे आपण किती सर्वधर्म समभाव मानणारे आहोत, हे 2019 ची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून दाखविण्याचा मोदींनी प्रयत्न केला; ही बाब मोदींची राजकीय मानसिकता स्पष्ट करते. आणि ते दुर्देव आहे. कारण, अशा जातीय राजकारणापासून राष्ट्रपती हे सर्वोच्चपद तरी दूर ठेवायला हवे. जातीचे हे राजकारण आता सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणे देशासाठी चांगले नाही. भारतीय राजकारण गंभीर वळणावर आले आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून तर जातधर्माच्या उघड आणि अभिमानाने फुशारक्या मारणार्यांची संख्यादेखील वाढली. सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेचा विसर पडू लागला आहे. आधुनिकतेचे गोडवे गाणारेसुध्दा सोशल मीडियावर जात आणि धर्म या मुद्द्यावर पातळी सोडून टीका करताना दिसतात. यास जबाबदार आहे ते ममास्टरस्ट्रोकफचे जातीय राजकारण; आणि यास कुठलाही पक्ष अपवाद नाही! मोदींनी मास्टरस्ट्रोक मारून राजकारणातील या जातीयतेची मुळे आणखी मजबूत केली.
सर्वधर्म समभावाचा सतत जप करणारी काँग्रेस तरी यापेक्षा वेगळी कशी असेल? त्यांचेही पाय मातीचेच. एनडीएने रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीसंबंधीत दलित उमेदवार पुढे केल्यानंतर काँग्रेसनेसुध्दा दलित समाजातील लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर केली. श्रीमती कुमार या खरेच शांत आणि आदर्श राजकारणी आहेत. आतापर्यंतच्या त्यांच्या एकुण वाटचालीवरून तरी तसेच दिसते. परंतु, अलिकडे त्या खूपच भावनिक झाल्याचे दिसून आले. उमेदवार निवडीसंदर्भात जातीचा केला जात असलेला उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मनातील ही खदखद त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. याआधीच्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये अनेकदा उच्चजातीचे उमेदवार होते. त्यावेळी कुणीही त्यांच्या जातीची चर्चा केली नाही. कोविंद आणि आपण निवडणुक लढवत आहोत म्हणूनच दलित उमेदवार निवडणुकीला उभे आहेत, असे चर्चेत आणले जात आहे. असे असेल तर आमच्यातील बाकीचे गुण गौण ठरतात. यावरून समाज आजही काय विचार करतो हे कळते. आता तर जातीला गाठोड्यात बांधून जमिनीत पुरायला हवे, असे वक्तव्य करून जात गाडून टाकण्याची भाषा त्यांनी केली. मीरा कुमार यांचे दु:ख, भावना समजता येतात. परंतु, समाजाला त्याबाबत त्यांनी केलेला उपदेश काही पचनी पडणारा नाही.
राष्ट्रपतिपदासाठी दलित उमेदवार भाजपने दिल्यानंतर मीरा कुमार यांच्या काँग्रेसनेही तोच कित्ता गिरवला. याचा अर्थ दोघांचेही राजकारण सोयीचेच आहे. दलित उमेदवाराशी लढत देण्यासाठी दलितच उमेदवार द्यायचा हा प्रकार म्हणजे शुध्द जातीयवादी राजकारण होय. समाजातील जातीयता नष्ट करायची असेल तर असले घाणेरडे मास्टरस्ट्रोक राजकीय पक्षांनी मारण्याऐवजी शंभर टक्के जातीमुक्त राजकारण केले पाहिजे. मीरा कुमार यांनी असे भावनाविवश होण्याऐवजी आपल्या पक्षापासून त्याची सुरूवात करावी. दलित उमेदवार तुमच्याच पक्षांनी द्यायचे आणि तुम्हीच भावनाविवश होऊन जातीयतेचे गाठोडे जमिनीत पुरण्याची भाषा करायची, ये बात कुछ हजम नही हुई! जात गाडावीच लागणार आहे. अन्यथा बलशाली भारताची निर्मिती कशी होईल!