विदर्भातल्या एका खेड्यात जन्म घेतलेले गाडगेबाबा कधीच कोणत्या शाळेत गेले नाहीत. परंतु, डझनावारी पदव्या घेतलेल्याच्या थोबाडीत मारावी अशी वैचारिक झेप घेताना गाडगेबाबा दिसतात म्हणूनच ते सध्याच्या नेहमीच्या संत रांगेत बसत नाहीत. मूळ वारकरी संत परंपरेशी त्यांचे नाते जुळते, वारकरी संप्रदायाचा विद्रोही आणि सुधारणावादी विचार चार पावले पुढे नेण्यात म्हणूनच गाडगेबाबांचा वाटा सिंहाचा आहे, हे कबूल करूनच पुढे जावे लागते.
जो- जो संस्कृतीच्या विरुद्ध बंड करून उठतो, संस्कृती त्यालाच पुढे गिळंकृत करून टाकते, असा आपल्या देशाचा दीर्घकालीन इतिहास आहे. बुद्ध, चार्वाक, जैन यांची उदाहरणे त्यासाठी पुरेशी बोलकी आहेत. विवेकानंद त्याचे अलीकडचे उदाहरण म्हणावे लागतील. त्यांनी हिंदू धर्माची जेवढी चिकित्सा केली तेवढी राष्ट्रीय पातळीवर कुणी केलेली दिसत नाही, त्या न्यायाने विवेकानंद हिंदुद्वेष्टे म्हणून प्रसिद्ध व्हायला हवे होते. मात्र तसे झाले नाही. संस्कृती उठाव अशाप्रकारे मोडीत काढीत असते. गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार ठरवून नाही का आपण मोकळे झालो? तसेच अलीकडे एका संतांच्या बाबतीत घडले आहे, ते संत म्हणजे गाडगेबाबा, खरंतर गाडगेबाबांना संत पदापेक्षा समाजसुधारक हे बिरुद अधिक शोभून दिसते नव्हे त्या पदाचेच ते खरे हकदार आहेत.आपण मात्र गाडगेबाबांना इतर संत आणि महाराज यांच्या रांगेत उभे करून त्यांच्यावर अन्याय करीत आहोत. विदर्भातल्या एका खेड्यात जन्म घेतलेले गाडगेबाबा कधीच कोणत्या शाळेत गेले नाहीत. परंतु, डझनावारी पदव्या घेतलेल्यांच्या थोबाडीत मारावी अशी वैचारिक झेप घेताना गाडगेबाबा दिसतात म्हणूनच ते सध्याच्या नेहमीच्या संत रांगेत बसत नाहीत, मूळ वारकरी संत परंपरेशी त्यांचे नाते जुळते, वारकरी संप्रदायाचा विद्रोही आणि सुधारणावादी विचार चार पावले पुढे नेण्यात म्हणूनच गाडगेबाबांचा वाटा सिंहाचा आहे हे कबूल करूनच पुढे जावे लागते. मुंबईसारख्या महानगरीतल्या नव्या पिढीला गाडगेबाबा कितपत माहीत आहेत याबद्दल शंका असली तरी जुन्या पिढीला त्याची जाणीव आहे. कारण मुंबईशी बाबांचा स्नेह जुना आहे, त्यांचे वांद्रे पोलीस ठाण्याच्या मैदानावर झालेले अखेरचे कीर्तन प्रसिद्ध आहे, त्याची ध्वनिफीत आजही उपलब्ध आहे. सिंहाला पाहावे वनात आणि गाडगेबाबाला ऐकावे कीर्तनात असे आचार्य अत्रे यांना याच प्रसंगावरून म्हणावेसे वाटले होते. याच दिवशी 1956 साली अमरावतीच्या पेढी नदीच्या काठावर गाडगेबाबांनी आपला देह ठेवला होता. धगधगते वैराग्य कशाला म्हणतात हे बघायचे असेल तर या योग्याचे जीवन, त्यांचा विचार आणि रोकडा धर्म समजून घेतला पाहिजे. शाळेचे तोंडही न पाहणार्या माणसाचे नाव एका विद्यापीठाला कसे काय लागते? असा प्रश्न अमरावती विद्यापीठात एकाही विद्यार्थ्याला आजवर का पडत नाही याचे गमक गाडगेबाबा नावाच्या चालत्याबोलत्या विद्यापीठात आहे. बाबा संपूर्ण महाराष्ट्र फिरले,
सगळी देवस्थाने बघितली पण जीवनात एकाही देवाच्या मंदिरात ते पाया पडताना दिसले नाहीत. धर्माच्या नावाखाली चाललेले पाखंड आणि कर्मकांड यांची अतिशय परखड चिकित्सा ज्या संत परंपरेला जमली नाही ते निडर काम करताना गाडगेबाबा अधिक तेजस्वी झालेले आपल्याला दिसतात. देवळात देव नसतो, पुजार्याचे पोट असते, जो देव स्वतःच्या नैवेद्याचे रक्षण करू शकत नाही तो काय तुमचे रक्षण करील? असे सवाल लाखो भाविकांपुढे करण्याचे धैर्य केवळ गाडगेबाबाच करू शकले होते. आजही प्रबोधन करणारी मंडळी धार्मिकबाबतीत परखड बोलू शकत नाही. परंतु, पंढरपुरात लाखो वारकर्यांपुढे बाबा म्हणत.. काही काम नसताना इथे आलात.. भरपेट खाल्ले आणि वाळवंटात सारी घाण करून ठेवली, आता ती कोण साफ करेल? तो विठ्ठल तर कमरेवर हात ठेवून उभा आहे, तो काही येणार नाही, चला आपणच साफ करू अशी हिंमत बाबा गेल्यानंतर कुण्याही संताने दाखवल्याचे उदाहरण नाही. सगळे लोकानुनयात व्यस्त आहेत. लोकांना जे आवडते तेच बोलले जातेय पण लोकांचे हित कशात आहे याचा विचार करून जागृती करणार्या संतांचा मोठा दुष्काळ सध्या समाजात पडला आहे
म्हणूनच गाडगेबाबा आठवतात. सध्या सत्यनारायण हा जणू आपल्या धर्माचा भाग बनला आहे, त्याच्या विरुद्ध शब्दसुद्धा कुणाची हिंमत होत नाही. परंतु, चालले सारेच्या सारे बह्याड बेलने खोटारडा सत्यनारायण कराले! हा कठोर प्रहार करताना गाडगेबाबा जराही विचलित होत नाहीत. आताच्या काळात आपण एखाद्या संस्थेला हजाराची देणगी दिली तर आपले नाव ठळकपणे लिहिण्याचा आपला आग्रह असतो, पण गाडगेबाबांनी कोट्यवधी रुपयांच्या धर्मदाय संस्था निर्माण करून आपण किंवा आपल्या कुटुंबातील एकही व्यक्ती त्यावर नसेल याची काळजी घेतली, पोटच्या मुलीलासुद्धा गोरक्षण संस्थेतून फुकटचे खाण्यावाचून वंचित करणारा हा महामानव प्रसंगी जनहितासाठी किती कठोर बनतो याचा सार्वजनिक संस्था चालवणार्यांनी नक्कीच अभ्यास करायला हवा. कबीर, संत तुकाराम यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्या बाबांचा बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्यावरसुद्धा तेवढेच प्रेम होते, प्रसंगी भोजनाचे ताट, अंगावरील कापड विका, पण मुलांना शिक्षण द्या, असा आग्रह त्यांच्यानंतर करताना कुणीच दिसत नाही यातच या प्रबोधनाच्या वटवृक्षाची माहिती दडलेली आहे, या समाजसुधारकाला पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!