भुसावळ। ‘एक डिग्री, एक विद्यापीठ’ संकल्पनेनुसार खान्देशातील सात अभियांत्रिकी महाविद्यालये आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे जि. रायगडे ला संलग्न झाली आहे. त्यापैकी भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयसुध्दा बाटूशी संलग्नित झाले आहे. या वर्षापासून या महाविद्यालयांनी बाटूशी संलग्न प्रथम वर्षाच्या प्रवेशाची जोरदार तयारी सुरु केली आहे. बाटूशी संलग्न प्रवेश हे टप्प्याटप्प्याने होणार आहे. यावर्षी प्रथम वर्षाचे, दुसर्या वर्षी द्वितीय व तिसर्या वर्षी तृतीय वर्षाचे प्रवेश होणार आहे. तसेच सध्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची पदवी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गतच पूर्ण होणार आहे.
14 पैकी सात महाविद्यालयांचा समावेश
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षतास येणार्या एकूण 14 टेक्निकल महाविद्यालयांपैकी सात महाविद्यालय आता बाटूशी संलग्न झाली आहे. यावर्षी बाटूशी संलग्न होण्यासाठी महाविद्यालयांना ऐच्छिक होते. पुढील वर्षापासून सर्वच्या सर्व महाविद्यालयाचे बाटूशी जोडली जाणार आहे. या वर्षापासून गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, धुळे येथील बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी, शिरपूर येथील आर.सी. पटेल महाविद्यालय, शहादा येथील पूज्य सानेगुरुजी अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूरचे धनाजी नाना अभियांत्रिकी महाविद्यालय या महाविद्यालयांना नुकतीच चार सदस्यीय शासन नियुक्ती तज्ञ समितीने भेट देवून सोयीसुविधांची पाहणी केली. त्यात प्रामुख्याने प्रयोगशाळा, ग्रंथालय, कार्यशाळा, वसतीगृहाला भेट दिली. त्यांनी याचा अहवालातही शासनाला सादर केला आहे. शासनाने या सर्व महाविद्यालयांना नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठास संलग्न होण्यास मान्यता दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात होणारे प्रवेश नवीन विद्यापीठांतर्गत होणार आहे. राज्यात 346 अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यापैकी 48 महाविद्यालये रायगड येथील तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाली आहे. टप्प्याने सर्वच महाविद्यालयांना यामध्ये सामावून घेण्यात येणार आहे. चालू औद्योगिक क्षेत्राशी ते मेळ खात नसल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून अत्याधुनिक अभ्यासक्रम या तंत्रज्ञान विद्यापीठात शिकविला जाणार आहे.