गाडीच्या शोरूमला लागलेल्या आगीत 2 ठार;

0

पनवेल : पनवेल जवळील खारघर येथील कोपरा गावाजवळ आज पहाटे आदित्य प्लॅनेट या इमारतीमधील मारुती सुझुकी गाड्यांच्या एक्सल ऑटोविस्टा या शोरूमला भीषण आग लागली. या आगीत शोरुमचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून त्यात शोरूममध्ये झोपलेल्या दोन कर्मर्‍यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 25 पेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सायन-पनवेल महामार्गावर हे शोरूम आहे. आदित्य प्लॅनेट या बारा मजली रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावर आठ गाळ्यात हे शोरूम आहे. ही आग पहाटे 4च्या सुमारास लागली असल्याचे सांगितले जात आहे. खारघर अग्निशमन दलाला यासंदर्भात माहिती देण्यात आल्यांनतर खारघर अग्निशमन दलासह नवी मुंबई महानगर पालिका, तळोजा आद्योगिक वसाहत याठिकाणच्या 10 ते 12 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने ही आग विझवण्याचे काम सुरू होते. सकाळी 8 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या पथकांना यश आले. दरम्यान लागलेल्या भीषण आगीचा धोका लक्षात घेता या इमारतीमधील फ्लॅटधारकांना त्वरित खाली उतरवण्यात आले. सुदैवाने ही आग वरपर्यंत पोहचली नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या इमारतीत शेकडो रहिवासी राहत आहेत.

दरम्यान, या आगीत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. कृष्णा कुमार (वय-25) आणि जितेंद्र कुमार सिंग (वय-24) असे या मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान शोरूम मालकाच्या हलगर्जीपणामुळेच अग्निशमन दलाला सुरुवातीला आग विझवण्यास अडथळा निर्माण झाला होता. शोरूम समोर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन बंबाना आग विझवण्यास अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान आग कशी लागली? कोणत्या कारणाने लागली? तसेच यासंदर्भात कोणी हलगर्जीपणा केला आहे? याची चौकशी सुरू असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी दिली. या आगीत जवळपास 25 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. यासह शोरूममधील फर्निचर, खुर्च्या, महत्वाच्या कागदपत्रांसह, इलेक्ट्रॉनिक वस्तूही मोठ्या प्रमाणात जळाल्या आहेत. तसेच या आगीची तीव्रता एवढी भीषण होती कि भिंतीवरील सिमेंटचा प्लास्टर खाली पडला. तसेच फरशादेखील उखडल्या गेल्या. इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणेबाबत आढळलेल्या त्रुटींबाबत मी आजच या इमारतीला नोटीस बजावणार आहे, असे अग्निशमन दलाचे अधिकारी अरविंद माने यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.