महेंद्र बनकर यांचा सवाल ; चुकीच्या सिग्नल यंत्रणेमुळे तसेच उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडीत भर
हडपसर : कुचकामी ठरलेली सिग्नल यंत्रणा, अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या पीएमपीएलच्या बसेस, त्यासमोर टेम्पो वाहनतळ, सासवड, जेजुरीकडे जाणार्या प्रवाशांची गर्दी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांची धावपळ, त्यात रिक्षा स्टँड हे दृश्य युपी, बिहारमधील एखाद्या बकाल शहरातील नसून हडपसरमधील गाडीतळावरील असल्याचे सांगत असे किती दिवस सामान्यांचा अंत पाहणार? यात बदल होणार की नाही? हा सवाल काँग्रेसचे ब्लॉक कमिटी उपाध्यक्ष महेंद्र बनकर यांनी उपस्थित केला आहे. यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जन आंदोलनाची वाट न पाहता योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा
चुकीच्या सिग्नल यंत्रणेमुळे सासवड रोडवरून येणारी वाहने आणि सोलापूर रोडवरून येणारी वाहने जवळपास एकत्रच येऊन थांबतात, त्यातील सासवड रोडवरच्या काही वाहनाना सोलापूर रोडला, तर काहीना पुण्याकडे जायचे असते, त्यात सोलापूर रोडवरील वाहनाना पुण्याकडे जायचे असते. परंतु सिग्नल कोणत्या वाहनांना मिळाला हेच नागरिकांना समजत नाही आणि छोटे-मोठे अपघात होतात. कधी-कधी नाहक बळी जातात, परिणामी गाडीतळापासून सातववाडीपर्यंत वाहनांच्या रांग लागून वाहतूक ठप्प होत असल्याचे बनकर यांनी सांगितले.
हडपसरमध्ये उभारलेल्या अभूतपूर्व, चमत्कारिक उड्डाणपुलांची वाहतुक सुरळीत होण्यास मदत न होता, उलट अडथळाच होत आहे. वाहतूक पोलीस उभे असतात तर कधी नसतात, त्यांचीही यात प्रचंड दमछाक होत आहे. पण यावर तोडगा काढण्यासाठी मात्र कोणी पुढे येत नाहीये, यात सर्वसामान्य हडपसरवासीय मात्र भरडला जात असल्याची खंत बनकर यांनी व्यक्त केली.