गाडीभर पुरावे घेवून पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे 135 जणांचे पथक माघारी

0

तब्बल तीन दिवस कसून चौकशी; बीएचआरच्या एमआयडीसीतील 500 हून अधिक संगणकाहस कागदपत्रे, फाईल सील करुन हस्तगत

झंवरच्या कार्यालयातूनही पुढार्‍याच्या लेटरहेडसह फाईली हस्तगत

जळगाव : शहरातील एमआयडीसी येथे मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणी घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगावात छापासत्र टाकल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून एमआयडीसीतील बीएचआरच्या मुख्य कार्यालयात तांत्रिक माहितीसह कागदपत्रांची चौकशी सुरु होती. ट्रकभर पुरावे घेवून तब्बल तीन दिवसांच्या चौकशीनंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे 135 जणांचे पथक रविवारी दुपारी पुण्याला माघारी परतले आहे. बीएचआरच्या मुख्य कार्यालयातील पाचशेहून अधिक संगणक, फाईली कागदपत्रे तसेच संशयित सुनील झंवर याच्या रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल येथील कार्यालयातून कागदपत्रे तसेच संगणक सर्व साहित्य सील करण्यात येवून स्वतंत्र ट्रकमधून नेण्यात आले. याप्रकरणात अवसायक जितेंद्र कंडारे याचा वाहनचालक कमलाकर भिकाजी कोळी यास आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून कंडारे एम.एच. 19 बी.यू 2323 या क्रमाकांची याचीही चारचाकीही जप्त करुन पुण्याला नेण्यात आली आहे.

पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात सहाय्यक उपायुक्त प्रेरणा कट्टे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त कल्याणराव विधाते, किशोर जाधव, गलांडे यांच्यासह 22 पोलीस निरिक्षक, 22 सहाय्यक पोलीस निरिक्षक व कर्मचारी अशा 135 हून अधिक कर्मचार्‍यांनी शुक्रवारी जळगाव शहरात बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे, विवेक ठाकरे, सुनील झंवर तसेच महावीर जैन, धरम सांखला यांच्या घरांसह कार्यालयावर छापे टाकले होते. याप्रकरणी शनिवारी पथकाने सुजीत सुभाष बाविस्कर उर्फ वाणी वय 65 रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा, धरम किशोर सांखला वय 40 रा. शिवकॉलनी, महाविर मानकचंद जैन वय 37 रा. गुड्डूराजा नगर, व विवेक देविदास ठाकरे वय 45 रा. देवेंद्रनगर यांना अटक केली होती. चौघांना 6 डिसेंबरपर्यंत नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संगणकांसह फाईली कागदपत्रे चारचाकीतून रवाना
चौघांना अटक केल्यानंतर इतर पथकांकडून शहरातील विवेक ठाकरे, यांच्यासह एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात तांत्रिक पुरावे, तसेच फाईल, कागदपत्रे सील करण्याचे काम सुरु होती. पंचासमक्ष पंचनामा करुन तसेच सील करण्यात कागदपत्रे तसेच संगणक सील करण्यात येत होते. बीएचआरच्या कार्यालयातून 500 हून अधिक संगणक जप्त करण्यात आले. एका खोक्यात ते सील करण्यात आले. खोक्यावर प्रत्येक संगणक असलेल्या कॅबिनचा तसेच खोलीचा क्रमांक नमूद करण्यात आला आहे. दुपारच्या सुमारास आयशरमध्ये ठेवण्यात आले. यानंतर झंवर येथील कार्यालयातून सील करण्यात आलेले संगणक तसेच कागदपत्रे, फाईल्स याच आयशरमध्ये ठेवण्यात आले. अशापध्दतीने झंवर याच्यासह इतर ठिकाणच्या कार्यालयातून सर्व कागदपत्रे तसेच तांत्रिक माहिती पुरावे संकलित केल्यावर आयशर दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान पुण्याकडे रवाना झाली. अतिशय खबरदारीने मुद्देमाल असलेले वाहन मधोमध तर त्याच्या पुढे व मागे कर्मचार्‍यांचे पथक यापध्दतीने रवाना झाले.

कंडारेच्या चालकासह त्याची चारचाकी ताब्यात
संशयित बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याची एम.एच. 19 बी.यू 2323 या क्रमाकांची महागडी चारचाकीही पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली आहे. ती सुध्दा खाजगी चालकाच्या सहाय्याने पुण्याला नेण्यात आली. दरम्यान यासायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जितेंद्र कंडारे याचा खाजगी वाहनचालक कमलाकर कोळी यास आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कंडारेच्या चालकाला कंडोरेच्या सर्व व्यवहाराची तसेच अपहार तसेच इतर सर्व महत्वाची माहिती होती. त्यानुसार पथकाने त्यास ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

झंवरसह संशयितांच्या मालमत्ताही रडारवर
संशयितांनी बनावट वेबसाईटव्दारे बीचआरच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता कवडीमोल भावात विकल्या. कंडारेच्या माध्यमातून ठिकठिकाणच्या सर्व मालमत्ता संशयित सुनील झंवर याने खरेदी केल्या आहेत. अटक झालेल्या तसेच फरार असलेल्या संशयितांच्या मालमत्ता आता पथकाच्या रडारवर आहे. संशयितांच्या जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या मालमत्तांचा शोध घेण्यात येवून त्यांचा लीलाव करण्यात येवून गुन्ह्यातील ठेवीदारांची रक्कम परत केली जाणार असल्याचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी बोलतांना सांगितले. दरम्यान फरार असलेल्या सुनील झंवरसह इतर संशयितांचाही शोध पथकांकडून सुरु आहे.

झंवरच्या कार्यालयात माजी मंत्र्याचे लेटरपॅड
संशयित आरोपी उद्योजक सुनील झंवर यांच्या खान्देश कॉम्प्लेक्समधील कार्यालयातून महापालिकेशी संबंधित वॉटर ग्रेस कंपनीच्या कागद पत्रांसह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, कागदपत्र जप्त केली आहेत. परंतू कुणाच्याही नावाचा कागद हा नेमका कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, याचा सखोल तपास केल्यानंतर अधिकचे बोलता येईल, असे भाग्यश्री नवटके यांनी बोलतांना सांगितले. दरम्यान पुढार्‍यांचे लेटरहेड सापडल्याने गुन्ह्यात झंवरसह संबंधित पुढार्‍यांचाही काही सहभाग आहे का? सहभाग निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.