सिलिगुरी । केंद्र सरकारने गाडीवरील लाल दिवा हटवण्यास सांगितले असले तरी पश्चिम बंगालचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अरुप बिस्वास मात्र बिनदिक्कतपणे लाल दिव्याचा वापर करत आहेत. ‘आमच्या सरकारने अद्यापपर्यंत लाल दिव्यावर बंदीवर आणलेली नाही. तसेच आम्ही इतरांचे आदेश पाळण्यासाठी बांधील नाही’, असे अरुप बिस्वास बोलले आहेत. केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याच्या दृष्टीने फक्त तात्काळ सेवा देणार्या गाडींवरच लाल दिवा ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये पोलीस, संरक्षण आणि निमलष्करी दल यांचा समावेश आहे. यांना वेगवेगळ्या लाल, निळ्या आणि पांढर्या रंगाचे दिवे वापरण्याची परवानगी आहे. व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्याच महिन्यात सर्व गाड्यांवरून लाल दिवे हटवण्याचा निर्णय घेतला होता. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांना या निर्णयातून सूट देण्यात आली आहे.