गाड्या चोरणार्‍या अल्पवयीन मुलाला अटक

0

सहा चोरीचे गुन्हे उघड

निगडीः परिसरात दुचाकी चोरी करणारा तरुण व एक अल्पवयीन मुलगा निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले असून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मौजमजेसाठी दुचाकी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
लक्ष्मण उत्तरेश्‍वर उबाळे (वय 19, रा. विठ्ठल हौसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो व त्याचा अल्पवयीन साथीदार हे निगडी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर दुचाकीवर बोलत उभा असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

चौकशीत गुन्हे उघड
त्या साथीदाराकडे पोलिसांनी चौकशी केली असता निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली उभ्या असलेली दुचाकी वाहने हे दोघे चोरत होते. पोलीस तपासात शिवाजीनगर, चिंचवड व निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, गुन्हे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस कर्मचारी जमीर तांबोळी, मंगेश गायकवाड, राम साबळे, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, शरिफ मुलानी, चेतन मुंढे, आनंद चव्हाण, स्वामीनाथ जाधव, मच्छिंद्र घनवट यांनी केली.