गाड्या जाळपोळीचे लोण बारामतीत

0

बारामती । पुण्यातील गाड्या जाळपोळीचे लोण आता बारामतीत येऊन पोहचले आहे. शहरातील मार्केट यार्ड समोरील देशपांडे वसाहतीतील मोटार सायकली अज्ञात इसमाने जाळल्याची घटना समोर आली आहे.

अभिनव टी सात या इमारतीतील मोटार सायकलींना आग लागल्याचे एका इसमाने मध्यरात्री 3 च्या दरम्यान पाहीले. त्वरित घटनास्थळी येऊन त्याने या इमारतीतील रहिवाशांना जागे केले. तोपर्यंत पाच दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. तर संजय भिसे यांची दुचाकी अर्धवट जळाली होती. अजय बगाडे, महेंद्र देशमुख यांच्यासह पाच जणांच्या दुचाकी जळाल्या आहेत. इमारतीच्या पार्कींगमधील एका कारलाही आग लागली होती. ही कार गॅस वर चालणारी असल्याने सर्व भयभीत झाले होते. परंतु कारचालकाने ती गाडी इमारतीच्या पार्किंगबाहेर आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरसेवक गणेश सोनवणे, पप्पु बल्लाळ, ब्रिजु मांढरे यांनी घटनास्थळास भेट दिली.