जेजुरी। महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरीत खंडोबाची देवाची यात्रा भरली आहे. त्यात गाढवांचाही बाजार भरला आहे. राज्य आणि परराज्यातूनही गाढव विक्रीसाठी जेजुरीत आणले आहेत. या बाजारात लाखोंची उलाढाल होत आहे. परंपरेनुसार जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेसाठी वैदू, बेलदार, गाडीवहार, मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील लाखो लोक जेजुरीत येत असतात. यात्रेनिमित्त भरलेल्या या पारंपरिक गाढव बाजारात सुमारे 2 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. सुमारे एक हजार पेक्षाही जास्त गाढवांची या वेळी दरवर्षीच विक्री होत असते. गाढव बाजारानिमित्त आलेले व्यापारी विक्रेते गडावर सुद्धा मोठ्या संख्येने दर्शनसाठी दाखल होत असतात.
रंग पाहून ठरविली जाते किंमत
या गाढव बाजारामध्ये गाढवाचे दात, रंग पाहून त्याची किंमत ठरविली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते. बाजारात गाढवे विक्रीसाठी आणणारे व्यापारी पौर्णिमेअगोदर गाढवांना भरपूर खायला घालतात. गूळ व तेलही खायला दिले जाते. त्यांच्या अंगावर लाल, निळे, हिरवे असे आकर्षक पट्टे ओढून त्याला सजविले जाते.