गाढोदा येथील शेतकर्‍याची शेतातच आत्महत्या

0

घरगुती वादातून केली आत्महत्या ः तालुका पोलीस ठाण्यात नोंद

जळगाव:दारुचे व्यसन असल्याने त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरु होते. या वादातून प्रकाश मानसिंग पाटील वय 31 रा. गाढोदा ता. जळगाव यांनी गावात असलेल्या आपल्या शेतात ठिबकच्या नळीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. रक्षाबंधन सणाच्या दिवशीच्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील गाढोदा येथे प्रकाश मानसिंग पाटील हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होते. घरापासून 500 मीटरच्याय अंतरावरच त्यांचे शेत आहे. सोमवारी प्रकाश पाटील यांचे घरात वाद झाले. या वादानंतर प्रकाश पाटील यांनी त्यांचे शेत गाठले. याठिकाणी त्यांनी शेतातील ठिबकच्या नळी निंबाच्या झाडाला बांधत गळफास घेतला. रस्त्यालगत शेत असल्याने ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलीस पाटील भगवान मधुकर पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार भगवान पाटील यांनी घटनास्थळ गाठले. तसेच तालुका पोलिसांना प्रकाराची माहिती देत प्रकाश पाटील यांना तत्काळ खाजगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अरुण राठोड करीत आहेत.

नेहमी सांगायचे आत्महत्या करीन
त्याच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश पाटील यांना दारुचे व्यसन असल्याने गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरु होते. या वादातून ते कुटुंबियांना मी नदीत उडी घेईन, विषप्राशन करेन तसेच गळफास घेवून आत्महत्या करण्याबाबत सांगत होते. सोमवारी वाद झाला अन् प्रकाश पाटील यांनी सांगितल्यानुसार शेतात गळफास घेत आत्महत्या केली. शेतात जात असतांना भेटणार्‍या ग्रामस्थांना प्रकाश पाटील हे गावाला सुतक पडेल, गावात दुखवटा होईल असे सांगत होते. मात्र कुणालाही कळाले नाही की प्रकाश पाटील हे आत्महत्या करतील व त्यानंतरच गावाला सुतक पडेल असे. प्रकाश पाटील यांच्या पश्‍चात पत्नी सुनंदाबाई, मुले भरत आणि संदीप, सुना व नातवंडे असा परिवार आहे.