मुंबई : औरंगाबाद येथील शासकिय विश्रामगृहात राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना जी मारहाण झाली, ती केवळ स्वसंरक्षणार्थ झाली. सुभेदार शासकिय विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक होती. त्याठिकाणी अचानक आयुक्त गायकवाड आले. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या बांऊन्सरने भारिपच्या पदाधिकार्यांना पाहून काही अनुसूचित उद्गार काढल्याने स्वसंरक्षणार्थ कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणीस ज.वि. पवार यांनी सांगितले आहे.
आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाल्यानंतर याप्रकरणी दस्तुरखुद्द आंबेडकरी नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पुढे आल्या. त्यामुळे याप्रकरणी भारिपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस ज.वि.पवार यांनी नरीमन पाँईट येथील पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
भारिप-बहुजन महासंघ हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेला पक्ष आहे. त्यामुळे विरोधी असलेल्या व्यक्तिला मारहाण करणे किंवा त्याला इजा होईल असे वागणे ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली असे म्हणता येणार नाही. तसेच त्यांच्या बांऊन्सरने कार्यकर्त्यांना अपशब्द वापरल्याने हे कृत्य घडल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त गायकवाड हेही आंबेडकरी समाजातीलच असल्याने त्यांना आम्ही शत्रू मानत नसल्याचे सांगत जर कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केले असेल तर त्यांना पक्ष पाठीशी घालणार नाही. मात्र भारिपच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे चुकीच्या पध्दतीने दाखल करण्यात आले आहेत. तसेच हे गुन्हे पोलिसांनी तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना सोमवारी मारहाण करणार्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आंबेडकरी चळवळ दडपण्याचा शासन प्रयत्न करत आहे. म्हणून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करणार्या सर्वपक्षीय दलित नेत्यांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बोळवण केली आहे. तसेच भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भूईगळ यांच्यासहित पाच जणांना प्रचंड पोलिस बंदोबस्तात आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने या सर्वांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी दुपारी आंबेडकरी चळवळीतील नेते गंगाधर गाडे, प्रा.अविनाश डोळस व अन्य नेत्यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाली नसून केवळ धक्काबुक्की झाली. त्याकरता अमित भुईगळ व अन्य 5 कार्यकर्त्यांवर खुनाचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी आग्रही भूमिका या नेत्यांनी घेतली.