न्यायालयाने सुनावली 14 पर्यंत आरपीएफ कोठडी ; अन्य पसार कर्मचार्याचा कसून शोध
भुसावळ- अकोला रेल्वे स्थानकाजवळील गायगावच्या पेट्रोल डेपोतील वॅगनमधून पेट्रोल चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरपीएफ उपनिरीक्षक राम नारायण यादव यांना 10 रोजी अटक केल्यानंतर सोमवार, 11 रोजी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता 14 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली. संशयीताच्या ताब्यातून दोन मोबाईलसह सीम कार्ड जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयीतांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
दुसरा उपनिरीक्षकही जाळ्यात
अकोल्याजवळील गायगाव पेट्रोल डेपोतून रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणार्या टोळीचा ऑगस्ट महिन्यात उरळ पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आरोपींशी अकोला रेल्वे सुरक्षा बलाचे लागेबांधे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोन उपनिरीक्षकांसह एका कर्मचार्यालाही आरोपी करण्यात आले होते तर गत महिन्यात 22 फेब्रुवारी रोजी उपनिरीक्षक प्रकाश मगर यांना अटक करण्यात आली होती तर तीन दिवसांच्या आरपीएफ कोठडीनंतर मगर यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
अटकेतील आरोपींची संख्या पोहोचली 16 वर
उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी 8 ऑगस्ट 2018 रोजी रेल्वे वॅगनमधील तसेच कंपन्यांच्या डेपोतील पेट्रोल चोरणार्या टोळीला अटक केल्यानंतर गायगाव डेपोचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर रेल्वे सुरक्षा बलाने हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशावरून तपासासाठी वर्ग करून घेतल्यानंतर या प्रकारात आरपीएफ कर्मचार्यांचे आरोपींशी लागेबांधे असल्याची बाब निष्पन्न झाली होती. या प्रकरणात सुरुवातीला 14 आरोपींना अटक होवून ते जामिनावर सुटले तर आरपीएफ उपनिरीक्षक प्रशांत मगर यांच्या अटकेनंतर संशयीतांची संख्या 15 वर पोहोचली तर सोमवारी पुन्हा उपनिरीक्षक राम नारायण यादव यांना अटक होवून यांच्या अटकेतील आरोपींची संख्या 16 वर पोहोचेली आहे. या गुन्ह्यात कर्मचारी बाबूलाल समाधान ढोकणे हे सुरक्षा बलाला वॉण्डेट असून त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्याचे सांगण्यात आले.
आरपीएफ उपनिरीक्षकाला 14 पर्यंत कोठडी
दरम्यान, पेट्रोल चोरी प्रकरणी अटकेतील आरपीएफ उपनिरीक्षक राम नारायण यादव यांना सोमवारी रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.आर.आर.अहिर यांनी 14 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावली. आरोपींतर्फे अॅड.आर.एम.यादवव व अॅड.वैशाली साळवे यांनी युक्तीवाद केला तर आरपीएफतर्फे आर.रॉय यांनी बाजू मांडली. तपास आरपीएफ निरीक्षक प्रवीण कसबे करीत आहेत.