नवी दिल्ली । प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि काँग्रेस नेत्याचा अश्चिल व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर तसेच पॉर्न वेबसाइटवर अपलोड केल्याप्रकरणी एका काँग्रेसच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव मोहन सिंग असे आहे. मोहन सिंग हा लुधियानातील काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायिका आणि काँग्रेसची नेता असलेल्या महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात आला.
या घटनेची माहिती होताच पीडित गायिकेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मोहन सिंग याला अटक केली आहे. मोहन सिंग हा चंदीगड रोडवरील गुरू तेगबहादूर नगरात राहतो. तो स्वत: प्रॉपर्टी डिलर असून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्याचा सक्रिय सहभाग होता. पंजाबी गायिका असलेली ही पीडित महिला 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून साहनेवालमधून निवडणूक लढली आहे. या जागेवर निवडणूक लढण्यासाठी आरोपी मोहन सिंग उत्सुक होता मात्र, तिकीट न मिळाल्याने तो नाराज होता. यामुळेच त्याने बदला घेण्यासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. माझ्या फोटोचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. माझ्या प्रतिष्ठेला काळीमा फासण्यासाठी हे षडयंत्र रचले.
असे केले आरोपीला अटक
आरोपी मोहन सिंग याने या गायिकेचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट आणि पॉर्न वेबसाइटवर अपलोड केला होता. तसेच हा व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला आणि त्यानंतर आपला नंबर बंद केला. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याने आपला नंबर पून्हा सुरु केला. पोलिसांनी सर्विलांसच्या माध्यमातून हा नंबर ट्रेस केला आणि आरोपी मोहन सिंग पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मोहन सिंग याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.