नवी दिल्ली । देशातील महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून समाजवादी पार्टीच्या खासदार अभिनेत्री जया बच्चन यांनी बुधवारी केंद्र सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. गायींना वाचवण्यासाठी इतके सगळं करता, मग महिलांचे काय?, स्त्रियांना वाचवण्यासाठीही पावले उचला, अशा शब्दांत जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. महिलांवर होत असलेले अत्याचार कमी होताना दिसत नाही. यावर युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. राज्यसभेत महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्याला जया बच्चन यांनी जोरदार उपस्थित केले. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. तुम्ही गायींना वाचवण्यासाठी पावले उचलत आहात, पण महिलांवरील अत्याचारांचं काय? महिलांवरील अत्याचार काही केल्या कमी होत नाहीत, असं सांगतानाच महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी सरकारने युद्धस्तरावर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली. जया बच्चन आज प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. त्या बोलत असताना इतर सदस्य बाके वाजवून त्यांचं समर्थन करत होते.