गायींबद्दल सहानुभूती नसणार्‍याला दया नाही

0

गुजरात । देशात गोमांस आणि कत्तलखान्यांवर वादविवाद सुरू असताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यामुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. गायींबद्दल दया नसणार्‍या व्यक्तींविषयी गुजरात सरकारला कोणतीही संवेदना नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले आहे.

गुजरात विधानसभेत आम्ही एक विधेयक मंजूर केले आहे. यामुळे गायीची हत्या करणार्‍या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल, अशा प्रकारचे विधेयक मंजूर करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य असणार आहे. गाय आमची माता आहे. आमच्या विश्‍वासाचे प्रतीक आहे. ज्यांच्या मनात गायीबद्दल दयेची भावना नसेल, त्यांना गुजरात सरकारकडून कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी म्हटले आहे. एका जनसभेत बोलताना विजय रूपानी यांनी हे विधान केले. राजस्थानमधील अलवरमध्ये मुस्लिमांना झालेली मारहाण आणि त्यात एका तरुणाचा झालेला मृत्यू या पार्श्‍वभूमीवर रूपानी यांनी हे विधान केले.

गाय आणि गोवंश यांची हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर नियम तयार केले आहेत. गाय फक्त आमच्या विश्‍वासाचे प्रतीक नाही, तर ग्रामीण भागात गायींच्या दुधामुळे लोकांचा उदरनिर्वाह चालतो. गुजरातमध्ये गायींमुळे घी आणि दुधाचे मुबलक उत्पादन होते. आम्ही गिर आणि काँकरेज गायींच्या प्रजातींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जर्सी गायींच्या प्रजातींपासून दूर जाता येईल, असेही रूपानी यांनी म्हटले.