श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलिसांनी शनिवारी दि. २ मार्च रोजी पहाटे चार वाजनेच्या सुमारास गारगोटी (स्फटिक) तस्करी करणाऱ्या एका पिकअप वाहनाचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन टन गारगोटी आढळून आली आहे. पोलिसांनी या कारवाईत ५ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, जलालपुर, ता. कर्जत या भागातून गारगोटीची तस्करी करणारा एक पिकअप श्रीगोंदा शहरातून जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलिस कर्मचारी अमोल आजबे, संदीप पितळे, संतोष धांडे, किसनराव औटी, यांच्या पथकाने दि. २ मार्च च्या पहाटे चारच्या दरम्यान श्रीगोंदा मांडवगन रस्त्यावर सापळा लावला. एक पिकअप (एम.एच.२१ – एक्स. -८१७९) हा भरधाव वेगाने तिथून वेगात निघुन गेला. या संशयास्पद वाहनाचा पोलिस पथकाने पाठलाग करून, शहरातील अवधूतनगर परिसरात हा पिकअप अडविला. सदर पीकअपमध्ये काय चालविले ? असे त्या चालकाला विचारले असता, त्याने गाडीमध्ये मका असल्याचे सांगितले. यावर पोलिस कर्मचारी अमोल आजबे यांनी गाडीची अधिक पाहणी केली असता, गाडीमध्ये हिरव्या रंगाचे दगड आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीची दोन टन गारगोटी व पिकअप गाडी असा ५ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हा दगड म्हणजे गारगोटी असून, तालुक्यात याची तस्करी होत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पिकअप ताब्यात घेत, या वाहनाचा चालक नदीम शब्बीर सय्यद रा. अंबड जि.जालना याच्या विरोधात गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल केला आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदीप पितळे करत आहेत. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी याप्रकरणी माध्यमांना बोलतांना सांगितले की, या प्रकारच्या गारगोटीची तस्करी नेमकी, कशासाठी केली जाते? याचा पोलीस शोध घेत आहेत. आणखी कोणत्या भागातून ही तस्करी सुरु आहे? याचाही तपास केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावात साकळाई देवीच्या जवळ वनविभागच्या जागेत दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ व दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ रोजी गट क्रमांक ५८ मध्ये अश्याच प्रकारे चोरी झाली होती. या दोन्ही वेळी वनविभाग श्रीगोंदा यांनी दिनांक २७ डिसेंबर २०१८ रोजी भारतीय वन नियमन अधिनियम १९२७ चे कलम २६ नुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गारगोटीला आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत प्रचंड मोठी मागणी असून, याला व्हाईट गोल्ड या नावानेही ओळखले जात असल्याची चर्चा आहे.