गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई द्या

0

एरंडोल । तालुक्यातील तळई, उत्राण परिसरात रविवारी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त फळबागांचे त्वरित पंचनामे करून अपघाग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे पं.स. सदस्य अनिल महाजन यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.तालुक्यातील तळई, उत्राण, ब्राम्हणे, ताडे, हणुमंतखेडे सिम या परिसरात रविवारी (7 मे) अचानक वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळे लिंबू, डाळिंब या फळबागांसह कांदा व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडले असुन रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांसमोरील समस्या वाढल्या आहेत. अचानक आलेले वादळ व गारांसह झालेली अतिवृष्टी यामुळे पिके जमीनदोस्त झालेली आहेत. याबाबत नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून अपाग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य अनिल महाजन यांनी केली आहे.श्री महाजन यांनी नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्रही यावेळी दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, ब्राम्हणेचे सरपंच किरण पाटील, शरद पाटील, रामदास पाटील यांचेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.