गारपीटीमुळे पिक नुकसानीची भरपाई द्या

0

एरंडोल। तालुक्यातील उत्राण येथे रविवारी दि. 7 मे 2017 रोजी संध्याकाळी अचानक सोसाट्याचा वारा व पावसासह गारपीट झाली. यामुळे परिसरातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीची त्वरीत भरपाई मिळावी, अशी मागणी एरंडोल पंचायत समितीच्या उत्राण गणाचे सदस्य अनिल रामदास महाजन यांनी केली असून तशा आशयाचे निवेदन तहसीलदार एरंडोल यांना देण्यात आले आहे.

आसमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत
उत्राण परिसरातील मोठ्या लिंबु वर्गीय फळबागा आहेत. तसेच कांदा, मका या पिकांची लागवड आहे. रविवार 7 मे रोजी अचानक आलेल्या वादळामुळे व गारपीट झाल्यामुळे सदर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नवीन पीक कर्ज मिळण्याकामी असलेल्या अनेक तांत्रिक अडचणीमुळे शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळणे लांबणीवर पडले आहे. अशा परिस्थितीत या अचानक आलेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. तरी या शेतकर्‍यांना गारपिटीची नुकसान भरपाई त्वरीत देण्यात यावी, असे आशयाचे निवेदन पं.स. सदस्य अनिल महाजन यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतांना पं.स. सदस्य यांचे समवेत अमित पाटील, शरद पाटील, ब्राह्मणे सरपंच किरण पाटील, शांताराम पाटील, रामदास पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.