गारबर्डी धरणावर दहा पर्यटक अडकले

जळगावसह धुळ्याहून बचाव कार्याची टीम घटनास्थळी रवाना

रावेर : सावदा शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील सुकी नदीवरील गारबर्डी धरणावर पर्यटनासाठी गेलेले दहा पर्यटक धबधब्याजवळ पाण्याचा वेढा पडल्याने अडकल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पर्यटकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून जळगावसह धुळे येथील बचाव कार्याची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. पर्यटकांना सुखरूप बाहेर कसे काढता येईल याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

सुकी धरणावर पर्यटक अडकले
सलग 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसानंतर सुकी नदीवरील गारबर्डी धरण ओसंडून वाहत असतानाच पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातील दहा पर्यटक गारबर्डी धरणावर गेले होते. धबधब्याजवळ हे पर्यटक गेल्यानंतर अचानक पाण्याचा व पुराचा प्रवाह वाढल्याने पर्यटक त्यात अडकले आहे. पर्यटकांनी मदतीसाठी टाहो फोडल्यानंतर गावातील नागरीकांनी तातडीने धाव घेतली तसेच प्रशासनाला माहिती कळवली. पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनीदेखील धाव घेत वरीष्ठांना याबाबत माहिती दिली आहे. रात्री उशिरापर्यंत पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह प्रशासकीय अधिकार्‍यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली आहे.