पाचोरा : तालुक्यातील गाळण बु.॥ येथील 46 वर्षीय शेतकर्याचा शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घटना घडली. कैलास बारकु पाटील (46) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
वादळी पावसात कोसळली वीज
गुरुवार, 9 जुन रोजी सायंकाळी 5.30 वाजता सोसाट्याच्या वार्यासह विजांचा कडकडाट सुरू असतानाच गाळण बु.॥ येथील कैलास बारकू पाटील (46) हे आपल्या शेतीच्या कामात व्यस्त असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक कैलास पाटील या शेतकर्याच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी काही अंतरावर त्यांच्या पत्नी देखील शेतात काम करत होत्या. त्यांनी एकच आक्रोश करत ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.
शेतकरी ठरला पहिल्या पावसाचा बळी
मयत कैलास बारकु पाटील यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. यावर्षीच्या पहिल्याच पावसाने निष्पाप शेतकर्याला आपला जीव गमवावा लागल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत कैलास बारकू पाटील यांच्या पश्चात्य पत्नी, तीन मुली, मुलगा असा परीवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.