धुळे। जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार हे शासनाचे महत्वाकांक्षी उपक्रम आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून सिंचनासाठी शाश्वत जलसाठा उपलब्ध होणार आहे. धरणातील गाळ शेतकर्यांनी शेतात टाकून जमिनीची सुपिकता वाढवितानाच ‘गाळमुक्त धरण’ उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. धुळे तालुक्यातील लामकानी येथील लालबर्डी धरणातील गाळ काढण्याच्या कामाचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते सकाळी उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, लामकानीचे सरपंच नानाभाऊ पाटील, उपसरपंच धनंजय कुवर, तहसीलदार अमोल मोरे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाळ शेतात टाकून जमिनीची सुपिकता वाढवावी
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, पावसाळ्यात नदी, नाले तसेच ओढ्यांना येणार्या पुरामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा साठा जमा होतो. या पुरात पाण्याबरोबरच माती, दगड, वाळू असे अनेक पदार्थ वाहून येतात. कालांतराने धरणाच्या साठवणूक क्षमतेत घट होते. धरणाच्या वयाबरोबरच जल साठवणुकीत येणारी घट ही वाढत जाते. धरणाच्या साठवणुकीच्या क्षमतेत घट झाल्यामुळे सिंचन क्षमतेवर परिणाम होताना दिसून येतो. धरणातील सुपिक गाळ शेतकर्यांनी आपल्या शेतात टाकून जमिनीची सुपिकता वाढवावी. जेणेकरुन उत्पादनातही वाढ होवू शकेल. शेतकर्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले. यावेळी उपविभागीय अधिकारी मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
अभियानाच्या कामांची पाहणी
‘गाळमुक्त धरणा’च्या उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी केली. तसेच लामकानी ग्रामस्थांनी लोकसहभागातून डॉ. धनंजय नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षित केलेल्या वनक्षेत्राची पाहणी केली. तसेच तेथे आगीच्या घटनांना प्रतिबंध बसावा म्हणून वनविभागाच्या निधीतून साकारण्यात येणार्या फायर ब्रेकरच्या कामाचीही पाहणी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी मिसाळ, तहसीलदार मोरे यांनी केली. यावेळी लामकानी वनसमितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.