बोदवड। पुर्णाची ओळख महाराष्ट्रात सर्वाधिक गाळ वाहून आणणारी नदी अशी आहे. या गाळामुळेच दरवर्षी उन्हाळ्याचा शेवटच्या आणि पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात पूर्णा नदीवरून पाणी उचलणारी ओडीए योजना अडचणीत येते. सध्या पावसाअभावी नदीची पातळी कमालीची घटली असून गाळयुक्त पाण्याने पुन्हा डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे मिठाअभावी क्लोरिनेशन प्रक्रिया बंद पडल्याने जलशुद्धीकरणासाठी अॅलम, टीसीएलचा प्रमाणापेक्षा जास्त वापर 32 गावांमध्ये अतिसाराला आमंत्रण देणारा ठरू शकतो. कालबाह्य झालेल्या ओडीए योजनेवरून बोदवड, मुक्ताईनगर आणि भुसावळ या तीन तालुक्यातील 32 गावांना पाणीपुरवठा केला जातो. मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे पूर्णा नदीच्या काठावरील इंटकवेलमधून योजनेसाठी रॉ-वॉटर उचलले जाते. हे पाणी सारोळा जलशुद्धीकरण केंद्रात आणल्यावर येथे क्लोरिनेशनासह अन्य प्रक्रिया केल्या जातात.
सारोळा केंद्रात होते शुध्दीकरण
सारोळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी योजनेतील संबंधित गावांमध्ये वेळापत्रकानुसार पुरविण्यात येत असते. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात पूर्णा नदीची पातळी घटल्यानंतर आणि पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर ओडीए योजनेला गाळमिश्रित गढूळ पाण्याने घरघर लागते. यामुळे ओडीएच्या यंत्रणेवर ताण पडत असतो. यंदा जून महिना संपला तरीही पूर्णा नदीला जोरदार पूर आलेला नाही.
अॅलमच्या अतिवापरामुळे अतिसाराचा धोका
नदीपात्रात पाणी पातळी कमी असल्यामुळे पातळी घटलेल्या इंटकवेलमधून पाणी उचल करताना पाण्यासोबत गाळदेखील मिसळला जातो. सारोळा केंद्रात हे पाणी शुद्ध करताना क्लोरिनेशन प्रक्रिया केली जाते. मात्र, क्लोरिनेशनसाठी लागणारे मीठ संपल्याने जानेवारी महिन्यापासून ही प्रक्रियाच बंद आहे. यावर पर्याय म्हणून जलशुद्धीकरणासाठी अॅलमचा वापर केला जातो. मात्र, पाण्यातील गाळाचे प्रमाण पाहता अॅलमचा प्रमाणापेक्षा जास्त वापर अतिसाराला आमंत्रण देणारा ठरू शकतो. दुसरीकडे टीसीएलचा प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यास जलशुद्धीकरण प्रकल्प ठप्प होण्याची भीती आहे. एकूणच ओडीए योजनेला सध्या समस्यांनी घेरल्याने जेमतेम शुद्धीकरण प्रक्रिया केलेले पाणी 32 गावांमध्ये पुरवले जाते. ओडीए योजनेवर जिल्हा परिषदेचे नियंत्रण असले तरी देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान नाही. दुसरीकडे योजनेचे पाणी घेणार्या गावांमधून पाणीपट्टीची वसुली होत नाही. यामुळे खर्च-उत्पन्नाचे गणित बिघडून योजना चालवणे जिकिरीचे ठरते. गत तीन महिन्यात 3 कोटी विजबिल थकल्याने योजनेचा विजपुरवठा तीन वेळा खंडीत झाला होता. शिवाय पाणी वाटपाचे नियोजन नाही.
विहिरीतही साचला गाळ
पुर्णा नदीत अधिक गाळ वाहून येत असल्याने वाहून आलेला हा गाळ नदीपात्रात तळाशी जमा होत असतो. पाणी पातळी कमी झाल्यास नदीतील इंटक विहरीतून पाण्याची उचल करताना पाण्यासोबत गाळही ओढला जात असतो. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणावर गाळमिश्रीत पाणी येत असते. मात्र ओडीए योजना कालबाह्य झालेली असून बोदवड, मुक्ताईनगरसह भुसावळ तालुक्यातील एकूण 32 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी या योजनेवर ताण पडत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळयुक्त पाणी शुध्द करणे अशक्य होत आहे.