18 नोव्हेंबरपर्यंत 10 लाख रक्कम भरण्याचे आदेश
जळगाव- मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 387 गाळेधारकांचे 2012 ला मुदत संपली होती. फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांना 81ब’ ची नुकसान भरपाईची नोटीस बजावून 11 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान,फुले, सेंट्रल फुले मार्केटमधील 21 गाळेधारकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. यावर न्यायाधीश बी. एच. घुगे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता गाळेधारकांना 18 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकी 10 लाख रुपये रक्कम भरावी असे आदेश दिले आहे.
यापूर्वी जिल्हा न्यायालयाने रक्कम भरण्याचे दिले होते आदेश
महापालिकेने 14 ऑक्टोबरला तीन गाळे सील केले. मात्र, कारवाईच्यावेळी अधिकारी आणि गाळेधारकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर फुले मार्केटमधील पाच गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात महापालिकेच्या गाळे सीलच्या कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. यावर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 26 ऑक्टोबरपर्यंत 75 टक्के रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन गाळेधारकांनी पैसे भरले तर दोन गाळेधारकांचे प्रशासनाने पैसे न भरल्याने गाळे सील केले आहे.
थकबाकीदार गाळेधारकांची यादी
महापालिकेने नुकसान भरपाईच्या नोटीसा बजाविल्यानंतर पैसे भरण्याची मुदत गाळेधारकांना दिली होती. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 600 गाळेधारकामध्ये सुमारे काहींनी पूर्ण तर काहींनी काही प्रमाणात पैसे भरले आहे. तसेच काही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. परंतु ज्यांनी एकही रुपयाचा भरणा केला नाही अशा 100 गाळेधारकांची यादी तयार केली आहे. मनपा प्रशासनाने कारवाईची तयारी केली आहे.