जळगाव । महापालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील मुदत संपलेल्या अनेक गाळेधारकांनी मागील वर्षांची भाड्याची बिले जुन्या ठरावानुसार रजिस्टर पोस्टाने महापालिकेला पाठविली होती. मात्र, जुना ठराव निलंबित असून त्या जागी नवा ठराव केल्या असल्याने ही बिले स्विकारणे योग्य होणार नाही असा अभिप्राय विधी विभागाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेने ही बिले गाळेधारकांना परत पाठविली आहेत.मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. 2012 पासून ते आजतागायत गाळेधारकांकडून भाडे थकलेले आहेत. गाळ्यांची मुदत संपण्यापूर्वी 5 जानेवारी 2012 रोजी 1231 क्रमांकाचा ठराव करण्यात आला होता. परंतु या ठरावाला काही गाळेधारकांनी हरकत घेवून शासनाने विखंडनासाठी पाठविले होते. त्यानुसार शासनाने 1231 क्रमांकाचा ठराव निलंबित केला आहे. त्यानंतर प्रशासनाने दि.19 डिसेंबर 2013 रोजी गाळ्यांबाबत यापूर्वी झालेले सर्व ठराव अधिक्रमीत करुन महासभेने भाड्यासंदर्भात 40 क्रमाकांचा ठराव केला आहे.
अॅड. ढाकेंकडून घेतला अभिप्राय
दरम्यान मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांपैकी सेंट्रल फुले मार्केट, रामलाल चौबे मार्केट, जुने बी.जे.मार्केट, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील काही गाळेधारकांनी जुन्या ठरावानुसार दरमहा 300 रुपये प्रमाणे दि.1 एप्रिल 2012 पासून ते दि.31 मार्च 2018 रोजीपर्यंत हिशोब करुन 21 हजार 600 रुपयाचे धनादेश पोस्टाने मनपा प्रशासनाकडे पाठविले होते. यावर धनादेश स्विकारावे की, नाही? याबाबत मनपा प्रशासनाने विधी सल्लागार अॅड.केतन ढाके यांच्याकडून अभिप्राय मागविला. यावर ढाके यांनी धनादेश स्विकारता येणार नाही, असा अभिप्राय दिला. त्यानुसार काही गाळेधारकांकडून प्राप्त झालेले धनादेश मनपा प्रशासनाने परत पाठविण्यात आल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली आहे.