जळगाव । काही गाळेधारकांनी त्यांना आलेले बिल हे अवाजवी असून ते भरू शकत नसल्याची कैफीयत अप्पर आयुक्त राजेश कानडे यांच्याकडे मांडली. यात आंबेडकर मार्केेट, भास्कर मार्केट, भिकमचंद जैन मार्केट, भोईटे मार्केट येथील व्यापार्यांचा समावेश होता. हे सर्व गाळेधारक जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना भेटावयास जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळीच गेले होते. मात्र, जिल्हाधिकार्यांची नियोजित बैठक असल्याने त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकली नाही. यावेळी गाळेधारकांनी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांची भेट घेण्याचे ठरविले. यानुसार त्यांनी आपला मोर्चा नगरपालिका विभागाकडे वळवीला. नगरपालिका विभागात जावून गाळेधारकांनी आपली व्यथा अप्पर आयुक्त राजेश कानडे यांच्याकडे मांडली.
‘बी प्रोफेन्शनल’ – अपर आरुक्तांचे वक्तव्र
गाळेधारकांनी आम्ही बील भरण्यास सक्षम नसल्याची व्यथा अप्पर आयुक्तांकडे मांडली असता अप्पर आयुक्तांनी हरकत ठेवून बील भरण्याचा सल्ला गाळेधारकांना दिला. यावर गाळेधारक नाराज झाले. तर पाच पट दंड मागे घेण्याची विनंती यावेळी गाळेधारकांनी केली. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसून आम्ही एकत्र लाखो रूपयांचे बील भरू शकत नसल्याचे सांगितले. यावेळी गाळेधारकांनी त्यांच्याकडील मागील बील दाखविण्याचा प्रयत्न केला असता कानडे यांनी मागे झालेल्या चुका पुन्हा करायला लावू नका असा सल्ला त्यांना दिला. 30 वर्षांपासून व्यवसाय करीत आहात बी प्रोफेन्शल असे म्हणत थकबाकी भरून जाहिर लिलावात सहभागी होण्याचे आवाहन अप्पर आयुक्त कानडे यांनी गाळेधारकांना केले.
गाळेधारकांनी सुवर्णमध्य साधण्याची विनंती कानडे यांच्याकडे केली असता यावर एकच तोडगा असून तो म्हणजे गाळेधारकांनी बीलाची रक्कम भरावी असे कानडे यांनी स्पष्ट केले. यात गाळेधारकांनी ते छोटे व्यावसायीक असून त्यांना एवढी रक्कम कमी कालवधीत जमविता येणार नसल्याचे स्पष्ट केले. पाच पट दंडाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर यावर महापालिकेच्या पदाधिकार्यांनी निर्णय घेतल्यास त्यानुसार बील तयार करता येईल अशी माहिती अप्पर आयुक्त कानडे यांनी केली. तसेच हरकत नोंदवून बीलांची सर्व रक्कम भरण्याचे कानडे यांनी सांगितले असता काही गाळेधारकांनी त्यांनी जास्तीचे भरलेली रक्कम परत मिळणार नाही अशी शंका व्यक्त केली. यातून गाळेधारकांमध्ये संभ्रम निमार्ण झाल्याचे दिसून येत होते. तर बील कसे जादा आले याबाबत ते वारंवार अप्पर आयुक्तांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. लिलावाची प्रक्रीयेतील अपसेट प्राइस ठरवून द्या अशी मागणी गाळेधाकरकांनी केली असता दोन ते तीन दिवसात अशी किंमत ठरवून देण्यात येईल असे अप्पर आयुक्तांनी सांगितले.
चर्चेनंतर गाळेधारकांमध्ये निराशा
बीलाबाबत काही हरकत असेल तर ती आयुक्त व महापौर यांच्या नावाने अर्ज देवून नोंदवा अशी माहिती अप्पर आयुक्त कानडे यांनी गाळेधारकांना दिली. यानंतर गाळेधारक कानडे यांच्या कॅबीनमधून बाहेर पडले. त्यांना कोणताच दिलास न मिळल्याने ते नाराज झाले होते. बाहेर आल्यावर एका गाळेधारकाने सांगितले की, थकीत बील भरल्यानंतर त्याच्याकडे पैसेच शिल्लक राहत नसल्याने त्याची इच्छा असूनही त्याला जाहीर लिलावात भाग घेता येणार नसल्याचे सांगितले.