पिंप्राळा परिसरात अमृतच्या चार्‍या बुजविण्यास सुरुवात

0

महापौर भारती सोनवणे यांनी दिले होते आदेश

जळगाव : शहरात अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून अनेक ठिकाणी नागरिकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असल्याने बुधवारी महापौर भारती सोनवणे स्वतः दुचाकीवर अधिकार्‍यांसह पिंप्राळा परिसरात फिरल्या. महापौरांनी अमृत योजनेसाठी खोदलेल्या चार्‍यांच्या डागडुजीचे आणि आवश्यकता असलेल्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात लागलीच सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुरुवारी चार्‍यांमधील माती काढून खडी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

महापौर भारती सोनवणे यांनी अमृतचे मक्तेदार प्रतिनिधी, मनपा अधिकारी व मजीप्रा अधिकारी यांच्यासह पिंप्राळा परिसरात बुधवारी कामाची पाहणी केली होती. यावेळी संबंधित मक्तेदाराला पाईपलाईनसाठी खोदलेल्या चार्‍या लागलीच बुजवून त्याठिकाणी डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापौरांच्या आदेशानंतर गुरुवारी पिंप्राळा परिसराकडे जाणारा मुख्य रस्ता, विद्यानगर, बालमोहन शाळेचा परिसर याठिकाणी अमृत योजनेच्या कामासाठी खोदलेल्या चार्‍यामधील माती बाहेर काढून तिची विल्हेवाट लावणे आणि चार्‍यांमध्ये खडी टाकण्यास सुरुवात झाली. तसेच मुख्य पिंप्राळा परिसर व गुजराल पेट्रोल पंपसमोरील भागात पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.