गाळेधारकांवर पुन्हा कारवाईचे संकट

0

मुदत संपलेल्या 18 पैकी 9 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना नोटीस

जळगाव– मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या महात्मा फुले,सेन्ट्रल फुले आणि जुने बीजे व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनंतर उर्वरित गाळेधारकांना कलम 81 क ची नोटीस बजावण्यात आली असून थकीत रक्कम भरण्यासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. थकबाकी न भरल्यास तसेच ज्या गाळेधारकांनी थकीत रकमेपैकी कमी रकमेचा भरणा केलेला आहे,अशा गाळेधारकांवरही कारवाईचे संकट येणार असून गाळे सील करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु झाल्या आहेत.

मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत एप्रिल 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. थकबाकी वसुल करण्यासाठी मनपा प्रशासनाने फेरमूल्यांकन करुन महात्मा फुले,सेन्ट्रल फुले आणि जुने बीजे व्यापारी संकुलातील गाळेधारकांना 2012 ते 30 जून2019 पर्यंतची थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी कलम 81 क च्या नोटीस बजावल्या होत्या.त्यानुसार काही गाळेधारकांनी पूर्ण थकीत रकमेचा भरणा केला,तर काही गाळेधारकांनी काही रकमेचा धनादेशाद्वारे भरणा केलेला असून तीन व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून आतापर्यंत 84 कोटींची वसुली झाली आहे. त्यानंतर उर्वरित व्यापारी संकुलांतील गाळ्यांचे रेडीरेकनरनुसार फेरमूल्यांकन करुन चौबे व्यापारी संकुल,धर्मशाळा,नानाबाई अग्रवाल संकुल,रेल्वे स्टेशन परिसरातील गाळे,शास्त्री टॉवर,भोईटे संकुल,वालेचा संकुल,शामाप्रसाद संकुल,डॉ.आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळेधारकांना कलम 81 क च्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर महात्मा गांधी संकुल,भास्कर संकुल आणि छत्रपती शाहू महाराज संकुलातील गाळेधारकांना बजावण्यात येणार आहे.

..तर सोमवारपासून गाळे सीलची कारवाई

मनपा प्रशासनाने महात्मा फुले,सेन्ट्रल फुले आणि जुने बीजे व्यापारी संकुलातील गाळेधारकांना यापूर्वी कलम 81 क अन्वये नोटीस बजावल्या होत्या. या तीनही व्यापारी संकुलातील काही गाळेधारकांनी कमी रकमेचा भरणा केला आहे. त्यामुळे ज्या गाळेधारकांनी कमी रकमेचा भरणा केला अशा गाळेधारकांची यादी तयार करण्यात येत असून सोमवारपासून गाळे सीलची कारवाई करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.