कारवाईबाबत अधिकार्यांना पेच,थकबाकी भरण्यास गाळेधारकांकडून प्रतिसाद नाही
जळगाव– मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलापैकी 4 व्यापारी संकुलातील गाळेधारकांना पोस्टाद्वारे नोटीस पाठवून 15 दिवसाची मुदत दिली आहे.गाळेधारकांनी थकबाकी न भरल्यास गाळे ताब्यात घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे.मात्र राजकीय दबाब येत असल्यामुळे अधिकार्यांना मोठा पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठेपले आहे.
मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. गेल्या सात वर्षापासून गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. मनपा प्रशासनाने यापूर्वी सरसकट बिले वितरीत केली होती.मात्र काही गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.याप्रकरणी न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने फेरमूल्यांकन करुन गाळेधारकांना 81 ‘क’ नुसार 30 जूनपर्यंत बिले तयार केली. थकीत रक्कम भरण्यासाठी गाळेधारकांना नोटीस बजावल्या परंतु गाळेधारकांनी नोटीस स्वीकारण्यास विरोध दर्शविला.त्यामुळे फुले व्यापारी संकुलासह 4 व्यापारी संकुलातील गाळेधारक ांना पोस्टाद्वारे नोटीस बजावल्या आहेत.तसेच नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे.
चार व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे 112 कोटींची थकबाकी
मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांपैकी फुले व सेेंट्रल फुलेसह चार व्यापारी संकुलात 976 गाळेधारक आहेत. या गाळेधारकांकडे आतापर्यंत जवळपास112 कोटी इतकी थकबाकी आहे. चार व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत रक्कम वसूल केल्यानंतर उर्वरित 14 व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून वसूल केली जाणार आहे.थकीत रक्कम वसूल झाल्यास मनपावरील आर्थिक ताण कमी होईल.त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.मात्र गाळेधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. थकीत रक्कम भरण्यास आयुक्तांनी 15 दिवसाची मुदत दिली आहे. 15 दिवसात रक्कम न भरल्यास कारवाईचा ईशारा दिला आहे.त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. गाळ्यांची कारवाई रोखण्यासाठी अधिकार्यांवर राजकीय दबाब आणला जात असल्याचे बोलले जात आहे.राजकीय दबावतंत्राचा वापर होत असल्याने अधिकार्यांना आता पेच पडला आहे.
गाळेधारकांची नकारघंटा
गाळेप्रकरणी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर नगररचना विभागातर्फे पुनर्मूल्यांकन करुन दि.30 जूनपर्यंत बिले दिली आहे.यापूर्वी वितरीत केलेली बिले सरसकट दिली होती.परंतु आता पुनर्मूल्यांकन करुन बिले दिल्यानंतरही थकीत रक्कम भरण्यासाठी गाळेधारकांची नकारघंटा सुरु आहे. प्रशासनाची कारवाई रोखण्यासाठी धास्तावलेले गाळेधारकांचे काही प्रतिनिधींच्या राजकीय पुढार्यांकडे चकरा सुरु झाल्या आहेत. राजकीय दबाबतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा अधिकार्यांमध्ये आहे.
मनपा प्रशासनासमोर आव्हान
महात्मा फुले व्यापारी संकुलासह चार व्यापारी संकुलातील 972 गाळेधारकांकडून आधी थकीत रक्कम वसूल करण्यासाठी कलम 81 ‘क’ अन्वये पोस्टाद्वारे नोटीस बजावल्या आहेत.15 दिवसात थकीत रक्कम न भरल्यास कारवाईचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.मात्र आतापासूनच राजकीय दबाब येत असल्यामुळे अधिकार्यांचा हिरमोड होवू लागला आहे. राजकीय दबाव झुगारुन कारवाई करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे.त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.