जळगाव। महानगरपालिकेच्या मालकीच्या 18 व्यापारी संकुलामधील 2175 गाळ्यांची मुदत संपल्याने औरंगाबाद खंडपीठाने गाळे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश 14 जुलै 2017 रोजी देण्यात आले होते. परंतु, याची अधिकृत प्रत काल बुधवारी महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. या 2175 गाळ्यांची मुदत 31मार्च 2012 साली संपुष्टात आली आहे. खंडपीठाच्या आदेशानंतर प्रशासन गतीशिल झाले आहे. प्रशासनाने गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रीयेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यात कागदपत्रांची जुळवा जुळव व पथकांसाठी कर्मचार्यांची चाचपणी सुरू झाली असल्याचे समजते.
अटी शर्तींचा केला भंग
फुले मार्केटसह चार मार्केटच्या मालकीबाबत आणि अटीशर्तीचे भंग केल्यामुळे व्यापारी संकुलांची जागा ताब्यात का घेऊ नये? यासाठी जिल्हाधिकार्यांनी बजावलेल्या नोटीसच्या विरोधात स्थायी सभापती डॉ. वर्षा खडके, माजी स्थायी सभापती नितीन बरडे आणि माजी उपमहापौर सुनील महाजन यांनीही याचिका दाखल केली होती. या सर्व याचिका एकत्र करीत औरंगाबाद खंडपीठात 14 जुलै 2017 रोजी कामकाज होऊन गाळे ताब्यात घेण्याची प्रकिया राबविण्याचा निकाल देण्यात आला आहे. या निकालाबाबतचे आदेश महानगरपालिकेला बुधवारी 26 जुलै रोजी प्राप्त झाले आहेत.
कागपत्रांची जुळावा जुळव
प्रशासनाकडून गाळेधारकांना देण्यात आलेल्या नोटीसा व सुनावणीची कागदपत्रे यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. तसेच कारवाईसाठी लागणारे पंचनामे व इतर साहीत्याची तयारी करण्यात येत आहे. तसेच ही कारवाई फुले मार्केटमधील गाळ्यांपासून सुरु होणार असल्याचे समजते. एकाचवेळी कारवाई करायची असल्याने त्यासाठी पथके करण्यासाठी कर्मचार्यांची देखील तयारी करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.