गाळे भाडेवाढ करुन मनपा व वक्फची थकीत रक्कम भरण्याचा ठराव

0

मार्केटमधील अतिक्रमण मनपा व पोलिसांच्या सहकार्यने काढणार

जळगाव । मुस्लिम कब्रस्तान व इदगाह कब्रस्तानची कार्यकारिणीची दुसरी सभा अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अध्यक्षतेखाली इदगाहच्या नवीन नूतनीकरण झालेल्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेला 15 पैकी 14 सभासद हजर होते. सभेत एकूण 7 ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सर्वप्रथम अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी नुतनीकरण कार्यालयाचे विधिवत फ़ित कापुन उद्घाटन केले. सहसचिव मुकीम शेख यांनी कुराण पठण केले. मानद सचिव फारुक शेख यांनी सभेचा अजेंडा व मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. वक्फ बोर्डातील केस संदर्भात विश्वस्तांना माहिती दिली. इदगाहच्या मालकीच्या गाळे करारनामा, भाडेवाढ व डिपॉझिटमध्ये वाढ करणे बाबत चर्चा झाली. यावेळी गाळे भाडे थकबाकीदारांना भाडे भरण्याची शेवटची 30 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विहीत मुदतीत थकीत भाडे भरले नाही तर जप्तीचा ठराव पारीत करण्यात आला. मनपा व वक्फची थकीत रक्कम त्वरित भरणे, कामी थकीत गाळे भाडे वसूल करून ती रक्कम अदा करण्याचे ठरले. इमाम व मौअज्जन यांच्या मानधनाबाबत विचार विनिमय करून तो दरमहा द्यावा की रमजानमध्ये बोनस स्वरूपात देण्यात यावा यावर चर्चा होऊन उलमा-ए-कौन्सिल’ शी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा असे सर्वानुमते ठरले. ईदगाह-कब्रस्तान मार्केटमध्ये झालेल्या अतिक्रमणाबाबत सुद्धा नोटीस देऊन आवश्यक कार्यवाही करावी अन्यथा मनपा व पोलिसांच्या सहकार्याने ते त्वरित काढण्यात यावे असे ठरले.

मनपाच्या सहकार्याने विस्तारीकरण

मनपा भाजप गटनेते तथा वार्डाचे नगरसेवक भगत बालाणी यांनी सुद्धा प्रत्यक्ष इदगाह व कब्रस्तानला भेट देऊन पाहणी केली असता मनपा निधीतून इदगाहमध्ये एका साईडला ब्लॉक लावून देणे व इदगाह मजीद शेजारील जागेत काँक्रीट करून देणेबाबत ट्रस्टतर्फे विनंती करण्यात आली असता ती त्यांनी मान्य करुन त्वरित शहर अभियंता सुरेश भोळे व कनिष्ठ अभियंता पुराणिक यांनी सदर जगेचे मोजमाप करून इस्टिमेट तयार करुन दिले. दरम्यान, नागरिकांच्या समस्या अथवा सूचना , तक्रार तसेच गाळेधारकांच्या तक्रारीबाबत इदगाह कार्यालयात सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत मानद सचिव फ़ारूक़ शेख,सह इतर विश्वस्त उपस्थित राहणार असल्याने या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष गफ्फार मलीक व मानद सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.