तळोदा । नगरपालिकेतर्फे होणार्या व्यापारी गाळ्यांचा लिलावात सामान्य व किरकोळ धंदेवाईकांचा अवाक्या बाहेरची आहे, असे चित्र आहे. अनामत रक्कम 3 हजार भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भाग घेता येईल व लिलाव जिंकल्यावर 7 दिवसात ना परतावा अधिमूल्य रक्कम भरणे सक्तीचे आहे. अन्यथा लिलाव रद्दबातल करण्यात येईल, अशी अट आहे. त्यामुळे अनामत भरल्यानंतर लगेच ना परतावा रक्कम तो कशी भरेल हा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. लिलावात पैसेवाले मोठे व्यावसायिक तथा श्रीमंत व्यक्तीच टिकू शकत असल्याची चर्चा सुरू आहे. भाग क्र.4 चा जागेवरील 38 गाळ्यांचा त्रैवार्षिक लिलाव 20 मार्चला सकाळी 11पासून सुरु होणार आहे.
आजपासून लिलावाची प्रक्रिया होणार
दुकान क्र. 108 ते 117 हे दहा गाळे अक्कलकुवा रोड लगतचे आहे. बोलीसाठी अनामत रक्कम 30 हजार रुपये एवढीच आहे. मात्र ना परतावा अधिमूल्य 1.65 लाखांपासून ते 2.58 लाखांपर्यंत आहे. हे मुल्य बोलीचे तिनवार झाल्यावर 7 दिवसात पालिकेत भरावे व त्यानंतर पालिका गाळ्यांचा ताबा देईल हे मूल्य बांधकाम क्षेत्राचा आकारानुसार कमी जास्त होते. या गाळ्यांचा उत्तरेस दुकान क्र. 80 ते 107 असे 27 व्यापारी गाळे आहेत. त्याच्यासाठी अनामत रक्कम तीस हजार आहे. बोली जिंकल्यावर ना परतावा अधिमूल्य 1.95 लाख ते 2.64 लाखांपर्यंत आहे. तसेच वार्षिक भाडे 10-16 हजार रुपयांवर आहे. त्यामुळे अनामत व ना परतावा अधिमूल्य रक्कम भरणे सर्वसाधारण किरकोळ विक्रेता, व्यावसायिक, व्यापारी यांना ही रक्कम भरणे शक्य होणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही लिलावाच्या सर्व प्रक्रिया, अनामत रक्कम व ना परतावा अधिमूल्य रक्कम व वार्षिक भाडे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग नंदुरबार शाखा यांचे सहाययक संचालक यांनी ठरविलेले आहे. महाराष्ट्र नगरपालिका नियम 1983 चे कलम9 (2)नुसार त्रिसदस्यीय समितीमार्फत होत आहे. हा लिलाव त्रैवार्षिक आहे. त्यामुळे बोली जिंकल्यावर सदर गाळा 3 वर्षापर्यंत ताब्यात राहील, अनामत व ना परतावा अधिमूल्य कमी करण्याची अपेक्षा आहे.