गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील- आ.राजूमामा भोळे

0

जळगाव -महापालिका मालकीच्या 18 मार्केटमधील सुमारे 2175 गाळ्यांच्या भाडेकराराची मुद संपली आहे. या गाळेधारकांकडे गेल्या सहा आठ वर्षांचे भाडे देखील थकीत आहे. महापालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्यानतंर यातील फुले मार्केटमधील बहुतांश गाळेधारकांनी भाड्याच्या रक्कमा भरल्या आहेत. तर उर्वरित मार्केटमधील गाळेधारकांना देखील नोटीसा बजावण्याची प्रक्रीया सुरु आहे. या गाळ्यांची थकीत रक्कम तसेच नूतनीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत आगामी महासभेत ठराव आणून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले. यावेळी भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी उपस्थित होते.

..तर अधिकारी,मक्तेदारावर कारवाई

गेल्या दिडवर्षापूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता येवून महापौर झाला. या दिड वर्षात मनपा कजर्र्मुक्त करण्यासोबतच समांतर रस्त्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला. आता शहरात केवळ रस्ते व मुलभूत समस्यांचा प्रश्न असल्याने त्यावरच भर द्यावा लागणार असल्याचे आमदार राजूमामा भोळे म्हणाले. महापालिकेत मक्ते देतांना निविदा तयार करतांनाच प्रशासनाकडून मक्तेदाराचे हीत जोपासले जाते. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोपही भोळे यांनी केला. असाच प्रकार स्वच्छतेच्या मक्त्याबाबत झाल्याचे ते म्हणाले. मनपाचा निधी परत गेल्यास अधिकारी व मक्तेदारांवर कारवाई करण्याचा इशारा देखील आ.भोळे यांनी दिला.

पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय

महापालिकेचे उमपहापौर आणि वर्षाभरासाठी संधी देण्यात आलेल्या स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार घेतले जाणार आहेत. या पदांवर कुणाला संधी द्यावी याचा निर्णय सर्वानुमते व पक्षनेत्यांच्या सूचनेनुसार घेतला जाणार असल्याचेही आ.भोळे यांनी स्पष्ट केले.