गाळ्यांचे सील उघडण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांकडून खंडणी

0

मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा खळबळजनक आरोप

जळगाव-मनपा मालकीच्या महात्मा फुले आणि सेन्ट्रल फुले व्यापारी संकुलातील अनधिकृत बांधकाम केलेल्या व दोन दारे असलेल्या 13 गाळ्यांना पालिकेच्या पथकाने सील केले होते. ही कारवाई अन्यायकारक पध्दतीने करण्यात आली असून या गाळेधारकांकडून सील उघडण्यासाठी मोठ्या पैशाची मागणी मनपा अधिकार्‍यांकडून करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे विरोधीपक्षनेते सुनिल महाजन यांनी केला आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा देखील महाजन यांनी दिला आहे.

महाजन यांनी केली पाहणी

फुले व्यापारी संकुलमध्ये गाळ्यांचा मुळ बांधकामात बदल करुन पार्टिशन टाकून व्यवसाय करणार्‍या गाळ्यांना सील केले.मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे. अनेक दुकानदारांचे त्यांच्या दुकानाला नकाशानुसार दोन शटर असून, दोन्ही दरवाजांद्वारे व्यवसाय केला जात असल्याचे म्हणणे आहे. गाळेधारकांच्या मागणीनुसार विरोधी पक्षनेते महाजन यांनी बुधवारी दुपारी फुले मार्केटमध्ये पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक राजू अडवाणी उपस्थित होते.

मनपात खंडणीबहाद्दर सक्रिय

विधानसभा निवडणूकीत गाळेधारकांच्या आश्वासनांची पूर्तता न करता भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी आता निवडणूक आटोपताच त्यांना वार्‍यावर सोडल्याचा आरोप सुनिल महाजन यांनी केला. गाळेधारकांनी थकबाकीची संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यात आता कॉर्नरच्या दुकानाचे एक शटर सील करून दुसरे शटर उघडे ठेवले आहे. यातून गाळेधारकांवर मोठा अन्याय होत असून, चुकीच्या बाबींना आमचा पाठिंबा नाही; परंतु पालिकेनेच ठराव करून परवानगी दिलेली असताना अचानक या कारवाई मागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला.गाळेधारकांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक गौप्यस्फोट केले. चटईक्षेत्रात व्यवसाय असलेल्या गाळेधारकांना गाळ्यांचे सील उघडण्यासाठी दहा हजार रुपयांपासून तर भविष्यात कारवाई न करण्यासाठी 50 हजारांपर्यंत मागणी केली जात असल्याचे महाजन यांनी सांगितले. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या गाळेधारकांकडून पुन्हा पैशांची मागणी करणे म्हणजे महापालिका प्रशासनात खंडणीबहाद्दर सक्रिय तर झाले नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली आहे.

लिलाव किंवा नुतनीकरणावर खल

मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. मनपा प्रशासनाने थकबाकी वसुलीसाठी कलम 81 क ची नोटीस बजावली आहे. काही गाळेधारकांनी पूर्ण थकबाकी तर काही गाळेधारकांनी बिलाच्या रकमेतील काही रकमेचा तर काहींनी एकही रुपया भरणा केलेला नाही.आतापर्यंत पाच संकुलातील गाळेधारकांना नोटीस बजावल्या आहेत.पाच व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून 167 कोटींची मागणी असून आतापर्यंत 57 कोटी रुपये जमा झाले आहे.तसेच बी.जे.संकुलातील 284 गाळेधारकांकडून 47 कोटींची मागणी असताना केवळ 6 कोटी रुपयाचा भरणा झालेला आहे. त्यामुळे कारवाईची मोहीम पून्हा सुरु केली जाणार असल्याचे समजते.दरम्यान,मुदत सपंलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांचे लिलाव करायचे की,नुतनीकरण करायचे यावर प्रशासनाकडून खल सुरु आहे.