शहादा। कवळीथ व सुसरी बंधार्यातून निघणारे कालवे अनुक्रमे 26.67 कि.मी.व 29.1 कि.मी.च्या कामाची पाहणी 25 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, तहसिलदार मनोज खैरनार, श्री.देवरे यांनी केली. अनेक वर्षापासून रखडलेली, अपूर्णावस्थेतील सदर दोन्ही कामे महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हिंग शहादा यांच्या सहकार्याने 35 दिवसात पूर्ण केल्याने जिल्हाधिकारी यांनी प्रशंसा केली व आपल्या हातून मोठे काम घडल्याची ग्वाही दिली.
सामाजिक कामे करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आवाहन
यापुढेही आर्ट ऑफ लिव्हिंगने पुढाकार घेऊन जलजागृती अभियान, जलसंधारण अभियान, झाडे लावणे अशी अनेक सामाजिक कामे करत राहण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी आवाहन केले. याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे किशोर पाटील, हरीश पाटील, सुरेखा पाटील, प्रा.ईश्वर पाटील, गणेश पाटील, शंभू पाटील आदी उपस्थित होते. केलेल्या कामाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे व स्वयंसेवकांचे शेतकरी व गावकरी आभार मानत आहे.
पाणी जिरविण्याचे कार्य
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत श्रीश्री रविशंकर हे भारतभर जलजागृती अभियान राबवित असून संस्थेमार्फत नदी, कालवे, नाले, तलाव, धरण यामधून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असून पाणी साठवणे, जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरविण्यासाठी कार्य सुरु आहे. सदर कालव्यांचा गाळ काढल्यामुळे पाण्याची पातळी वाढून जमिनीत पाणी अधिक प्रमाणात मुरणार असल्याने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.