यावल। पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील सर्व 20 पाझर तलावांमध्ये साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. यानुषंगाने सातपुड्यात वनविभागाच्या हद्दीतील तलावांतील गाळ काढून नेण्यास शेतकर्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार हरिभाऊ जावळे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. तालुक्यात सातपुड्याच्या पयथ्याशी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने ठिकठिकाणी 20 पाझर तलाव बांधले आहेत. या सर्व तलावांची क्षमता 150.64 दशलक्ष घनमीटर जलसाठ्याची आहे. मात्र, निर्मितीपासून आजतागायत 20 पैकी एकाही तलावातील गाळ उपसा झालेला नाही. परिणामी चांगला पाऊस होऊनदेखील तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही.
बहुतांश तलाव वनविभागाच्या हद्दीत
दरम्यान, 20 पैकी बहुतांश तलाव वनविभागाच्या हद्दीत आहेत. या तलावातील गाळ काढणे किंवा त्याचा उपसा करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक ठरते. ही परवानगी मिळावी यासाठी आमदार हरिभाऊ जावळे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना लेखी पत्र दिले आहे.
असा आहे तलावातील जलसाठा
सद्यस्थितीत नागादेवी 16.62 दलघमी, न्हावी भिलानी 5.43, लघुपाटबंधारा जामन्या 25.70, गिरडगाव 12, डोंगरदे गाव 7.74, डोंगरदे 1.14, डोंगरदे 2.73, डोंगरदे 3.42, न्हावी 6.53, मारूळ 7.70, मारूळ 5.01, मनुदेवी 19.75, मावळा-वड्री 6.60, वाघझिरा 0.82, वाघझिरा गावखोरा 5.03, वाघझिरा कलम्या पाणीखोरा 7.72, हरिपुरा 0.72, सांगवी 3.42, वड्री 6.12, कठोरा 5.82 दलघमी.