श्रीगोंदा । अहमदनगरमधील श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीला भररस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार कॅमेर्यात कैद झाला असून पोलिसांनी तब्बल आठवडाभरानंतर चार जणांविरोधात विनयभंग, अॅट्रॉसिटी आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही. यामुळे स्थानिक गावकर्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी श्रीगोंदामधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून त्यांनी व्हिडीओ पोलिसांना दाखवला. पोलिसांनी बोनगे आणि त्याच्या मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप आरोपींना अटक न झाल्याने कुटुंबियांसह स्थानिक ग्रामस्थांकडूनही संताप व्यक्त होत आहे. मुलीच्या कुटुंबियाने या घटनेचे चित्रीकरण केले. या व्हिडिओत बोनगे आणि त्याच्या अल्पवयीन मुलांची गुंडवृत्ती ठळकपणे दिसून येत आहे. पोलीस याबाबतही कसून तपास करत आहेत
काय आहे हे प्रकरण?
श्रीगोंदा येथील पारगावमधील मडकेवाडीत राहणार्या पीडित मुलीचे आजीआजोबा रस्त्यावरून जात असताना सुनील बोनगेने त्यांना अडवले. रस्ता बंद झाला असून तुम्ही दुसर्या मार्गाचा वापर करा असे त्याने सांगितले. पीडित मुलीचे कुटुंब नियमितपणे त्याच रस्त्यावरून येत-जात असल्याने बोनगे त्याच्या दोन मुलांसह 21 जून रोजी पीडित मुलीच्या घरी गेला. पीडित मुलीच्या आई- बाबांशी बोलताना अर्वाच्च भाषेत बोलत असल्यामुळे मुलीचा संयम सुटला. त्यामुळे तिनेही बोनगेला प्रत्युत्तर दिले. मुलगी बोलल्यामुळे बोनगेचा अहंकार दुखावला. तिच्या बोलण्याचा राग मनात धरत त्याने पीडित मुलीला भररस्त्यात गाठून मारहाण आणि शिवीगाळ केली.