सणसवाडी । 1 जानेवारी रोजी सणसवाडी व कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद महाराष्ट्राभर पसरले असल्याने या परिसराची सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. यात खतपाणी घालण्याचे काम सोशल मीडियातून तसेच जातीय संघटनेतून होत आहे. सणसवाडी गाव इंटेलिझन्सच्या रडारवर असल्याने संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषीत झाले आहे. स्थानिक भागात सामाजिक व्यवस्था पुर्ववत करण्यासाठी पुढाकार घेत गावचे गावपण टिकवण्यासाठी गावातील सर्व समाजामध्ये संवाद घडविण्यास पुढे येण्याची गरज असल्याचे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
25 एप्रिल सणसवाडीतील ग्रामस्थ व महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याचा आरोप करून सणसवाडी ग्रामस्थांनी रास्ता रोको व गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करत सुरेश सकट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली. याची दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभुमिवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सणसवाडीला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. पोलिस अधिक्षक सुवेझ हक, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, गणेश मोरे, रमेश गलांडे, अतुल भोसले, शिवशांत खोसे, चेतन थोरबोले, कुसुम मांढरे, रमेश सातपुते, सुनिता दरेकर, दत्तात्रय माने, वैभव यादव, दत्ताभाऊ हरगुडे, आशा दरेकर, अजित दरेकर, अॅड. विजयराज दरेकर आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
स्वरक्षणसाठी प्रतिकार केला तरी ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले, शिक्षा भोगली तरी पुन्हा पुन्हा गुन्ह्यांमध्ये गोवले जात असल्याने ग्रामस्थांची आता सहनशिलता संपली असल्याचे ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडताना यावेळी सांगितले. बाहेरच्या लोकांमुळे गावातील शांतता, सामाजिक सलोखा विस्कटल्याचे सांगत अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. गावामध्ये ठराविक लोकांना लक्ष करण्यात येत असल्याचे गावकर्यांनी सांगितले.
सर्वांनी आत्मपरिक्षण करावे!
सणसवाडीत औद्योगील क्षेत्र झपाट्याने वाढल्याने नागरिकरणातही मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे गावामध्ये ताणतणावही वाढू लागल्याने सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक व पेरणे परिसर संवेदनशील झाला आहे. याठिकाणच्या उद्योग, व्यवसाय, व्यवहाराबरोबरच जनजीवनावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने सर्वांनी आत्मपरिक्षण करण्याचीही गरज असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. कोणती बाहेरची शक्ती गावाचे वातावरण दुषीत करत आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. गावातील सामाजीक सलोखा जपण्यासाठी महापुरुषांच्या जयंत्या या सर्व समाजाचा उत्सव म्हणून साजरा करण्यास पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.