गावठाण फिडरवरून विद्युत पुरवठा व्हावा

0

शहादा । तालुक्यातील मानमोडे येथील कृषी वाहिनीवरून होणारा विद्युत पुरवठा गावठाण फिडर वरुन मंजुर व्हावी, या मागणीसाठी मानमोडे परिसर व गावातील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी नंदुरबार जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. वनविभागाचा आडमुठे धोरणामुळे तसेच महावितरणाच्या दुर्लक्षामुळे ही गावे गावठाण फिडर वंचित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निवेदनावर 111 ग्रामस्थ व शेतकर्‍यांचा स्वाक्षर्‍या आहेत.

मोटारी चालत नसल्याने शेतकरी त्रस्त
मानमोडा, सटीपाणी, भोंगरे, चांदसैली, वडगाव, शहाणा मलगाव, भुलाणे आदी गाव ही जवळपास 100 टक्के अनुसुचित जाती जमातीची असुन येथील विद्युत पुरवठा हा गावठाण फिडर वरुन होण्यासाठी गेल्या 8 ते 9 वर्षापासून मागणी होत आहे . ही गावे ही मंदाणे विद्युत उपकेंद्रापासुन 25 ते 30 कि .मी. अंतरावर आहेत व या गावाना मंदाणा उपकेंद्रापासुन विद्युत पुरवठा होतो. सदरील गावात पाणीपुरवठा योजना व शेतीपंपाचा मोटारी मंदाणे उपकेंद्राचा विद्युत पुरवठयावर चालतात. त्यामुळे विद्युत पुरवठा अपूर्ण दाबाचा होत असून शेतातील शेतीपंपाचा मोटारी चालत नाहीत त्यामुळे शेतकरी व गावातील नागरीक त्रस्त झालेले आहेत . पाणी असुन पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येवुन ठेपली आहे. मानमोड्या गावापर्यंत गावठाण फिडर ची लाइन आलेली आहे. त्यामुळे निधीची समस्या भासणार नाही. फक्त कार्यालयीन कामकाजामुळे ही कामे रखडलेली असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या आधी जि. प. सदस्या पुष्पा गांगुर्डे ,कांग्रेस तालुका अध्यक्ष दिलीप गांगुर्डे व परिसरातील वंचित ग्रामस्थानी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले होते. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पालक मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन मंडळाचा सभेत हा विषयाची चर्चा झाली. परंतु मागणी प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.