सांगवी : गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या तरुणाकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. इसाक रज्जाक शेख (वय 25, रा. पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नितीन मारूती दांगडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे एक तरुण संशयितरित्या उभा असून त्याच्याजवळ गावठी कट्टा आहे, अशी माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी 25 हजार रुपयाचा कट्टा व काडतूस जप्त करत तरुणाविरोधात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ तपास करीत आहेत.