गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना गलंगीजवळ अटक

0

जळगाव/चोपडा । चोपडा-शिरपुर रस्त्यावरील गलंगी गावानजीक असलेल्या हॉटेल सपनाजवळ दोन इसमांना गावठी कट्टा बाळगतांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शनिवारी अटक केली आहे. यासोबतच त्यांच्याजवळून दोन गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून दोघांना पुढील कारवाईसाठी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना गलंगी गावाजवळील हॉटेल सपनाजवळ दोन इसम गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहिती मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारावर चंदेल यांनी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील, सागर शिंपी, मनोहर देशमुख, रविंद्र गायकवाड, अशोक चौधरी, महेंद्र पाटील, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, प्रकाश महाजन, योगेश पाटील, मनोज दुसाने, प्रविण हिवराळे आदींच्या पथकाला चोपडा-शिरपुर रस्त्यावरील गलंगीगाजवळ तपासासाठी पाठविण्यात आले. यावेळी हॉटेल सपनाजवळ दोन इसम गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहितीची खात्री होताच त्यांनी सापळा रचत दोघांना अटक केली. यावेळी त्यांची विचारपूस केली असता एकाने राजू फिरंग्या पावरा (वय-34) तर दुसर्‍याने सुकराम मलजी पावरा (वय-35 दोन्ही रा. महादेव ता. शिरपुर) अशी नावे सांगितली. यानंतर त्यांच्याजवळील दोन बनावठ गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुस जप्त करण्यात येवून दोघांना पुढील कारवाईसाठी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले.