गावठी कट्टा लावून कापूस व्यापार्‍याला लुटले : पाचही आरोपींना जळगाव गुन्हे शाखेने केली अटक

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त : सोनाळा गावातील संशयीत निघाला सूत्रधार

जळगाव/भुसावळ : कापूस व्यापार्‍याला गावठी कट्टा लावत त्याच्याकडील सात लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना सोनाळा फाट्याजवळ बुधवार, 24 रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव गुन्हा शाखेने 24 तासात गुन्ह्याची उकल केली असून पाच आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. गोपाल हरी पाटील (36, सोनाळा, ता.जामनेर), प्रवीण रमेश कोळी (26, वाल्मीक नगर, जळगाव), गोपाल श्रावण तेली (39, कळमसरा, ता.पाचोरा), प्रमोद कैलास चौधरी (27, कळमसरा, ता.पाचोरा), लाखन दारासिंग पासी (34, जुना आसोदा रोड, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कापूस विक्रीची रक्कम लुटून आरोपी झाले पसार
सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान पप्पू ती स्टॉल पासून 200 मीटर अंतरावर मोटरसायकलवर दोन जण त्यांचा पाठलाग करत होते तर तलावाजवळ आधीच दोन जण थांबलेले होते. बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांची मोटरसायकल अडवत गावठी कट्टा लावून त्यांच्याकडील सात लाखांची रक्कम लुटल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे गोपाल हरी पाटील (36, सोनाळा, ता.जामनेर) यास सुरूवातीला संशयीत म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्यास बोलते केल्यानंतर त्याने अन्य चार साथीदारांची नावे सांगत लुटीतील रक्कम आपसात वाटून घेतल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने चौघांना अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देत लुटीत वापरलेला गावठी कट्टा, दुचाकी, पाच मोबाईल तसेच रोकड मिळून एकूण पाच लाख 96 हजार 960 रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहा.निरीक्षक जालिंदर पडे, उपनिरीक्षक अमोल देवरे, सहा.फौजदार अशोक महाजन, हवालदार संदीप सावळे, हवालदार जयंत चौधरी, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील आदींनी उघडकीस आणला.