जळगाव : गावठी बनावटीचा कट्टा, चार जिवंत काडतुस व तलवार बाळगणार्या एका तरुणाला तालुका पोलिसांनी बिबा नगर येथून शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अटक केली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल रघुनाथ भोई (31, बिबा नगर, नारायण नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बिबा नगर परीसरात एक तरुण बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचा कट्टा, कडतुस आणि तलवार बाळगत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले, रवींद्र मोतीराया, तुषार जोशी, संजय भालेराव, दिनेश पाटील, अशोक महाले, महिला पोलिस कॉन्स्टेबल शोभा न्याहळदे आदींच्या पथकाने संशयीत आरोपी अनिल रघुनाथ भोई यांच्या घराची शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता झडती घेतली. या झडतीत त्याच्या घरातून गावठी बनावटीचा कट्टा, 4 जिवंत काडतुस आणि लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. संशयीत आरोपी अनिल भोई याला पोलिसांनी अटक केली. पोलिस कॉन्स्टेबल विश्वनाथ बाबूलाल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.