गावठी कट्ट्यासह पाणीपुरी विक्रेता एलसीबीच्या जाळ्यात
धुळे गुन्हे शाखेची कारवाई : गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त
धुळे : व्यवसायाने पाणी पुरी विक्री करणार्या विक्रेत्याकडे पिस्टल असून त्या धाकावर तो दहशत निर्माण करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत आरोपीला अटक करीत त्याच्याकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी धुळ्यातील नगावबारी परीसरातील प्रियदर्शिनी नगरातून आसीफ प्यारेलाल खाटीक यास अटक करण्यात आली व त्याच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पाणी पुरी विक्रेता जाळ्यात
धुळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना देवपुरातील पाणीपुरी विक्रेता आसीसफ प्यारेलाल खाटीककडे कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाई आदेश दिले. पथकाने आसीफ खाटीक याला त्याच्या घरून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घर झडतीत लाकडी कपाटातून 20 हजार रुपये किंमतीचे पिस्टल व दोन हजार रुपये किंमतीच्या दोन जिवंत काडतूस काढून दिल्या. पोलिस कर्मचारी विशाल भालचंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, अशोक पाटील, संदीप सरग, रवींद्र माळी, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील यांनी ही कारवाई केली.