शेंदुर्णी : येथून जवळच असलेल्या पहुर पोलिस ठाण्याचे हद्दीतील तोंडापुर या गावी गावठी हातभट्टी दारू बनवण्याचा व विकण्याचा भट्टीवर पहुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी आपल्या सहकार्यासह छापा घालून तीन दारूच्या टाक्या व रसायन मिळून 1200/- रुपयांचा माल उध्वस्त केला. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
तोंडापुर बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे हात भट्टीची दारू विकले जात असल्याबद्दल माहिती मिळाली होती. परंतु छापा टाकण्याआधीच आरोपींना कुणकुण लागत असल्याने आरोपी पळून जात होते. मात्र काल दिनांक 22 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांनी गुप्तपणे गावठी दारू निर्माण करण्याच्या ठिकाणावर छापा टाकला असता आरोपी पळून गेले. पण मुद्देमाल ताब्यात घेऊन दारूची भट्टी पूर्णपणे नष्ट केली.
महिलेविरूध्द गुन्हा दाखल
यावेळी लताबाई राजू म्हस्के यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 272/19 मुंबई पोलीस ऍक्ट 65 फ,ब,क,ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दारू विक्री व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी गावातील युवकांनी ऑनलाइन तक्रारी नोंदविलेल्या होत्या. त्याची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच कारवाईत सातत्य ठेवण्यात यावे अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.