निगडी : एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला निगडी ओटास्कीम येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी शनिवारी केली. सुधाकर उर्फ पिंटु तुकाराम सुर्यवंशी (वय 30, रा.निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात आर्म अक्ट कायद्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी निगडी पोलिसदलातील पोलीस नाईक संदिप पाटील आणि गणेश शिंदे यांना त्यांच्या खबर्याकडून माहिती मिळाली की, निगडी ओटास्कीम बौध्दनगर येथे एका तरुणाकडे गावठी पिस्टल आहे. यावर निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र निकाळजे, संदिप पाटील, गणेश शिंदे, राहूल मिसाळ, विनय बोडके, मितेश यादव, विलास केकान, रमेश मावस्कर, सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने सापळा रचून संशयीत आरोपी सुधाकर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 25 हजार 200 रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी त्यासह सुधाकर याला अटक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.