गावठी पिस्टलासह पाच जिवंत काडतूस बाळगणारे आरोपी कोठडीत

Bhusawal Villager Carrying Catta : Accused In Police Custody For Three Days  भुसावळ : शहरातील वरणगाव रोडवरील गोलाणी कॉम्प्लेक्समधील दुर्गा देवी मंदिर परीसरात दोघांना दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसांसह बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून अटक केली. सै.सिकंदर बशरात अली व नरेश देविदास सुरवाडे (दोन्ही रा.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे असून. ही कारवाई रविवारी दुपारी 4.15 वाजता करण्यात आली. दरम्यान, सोमवारी आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना वरणगाव रोडवरील गोलाणी कॉम्प्लेक्स जवळील दुर्गा देवीच्या मंदीर परीसरात दोन संशयीत फिरत असल्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहा.पोलिस निरीक्षक हरीष भोये, विजय नेरकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, शशिकांत तायडे, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार यांच्या पथकाने दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले होते.

पिस्टल व काडतूस जप्त
यावेळी संशयीतांचा पळण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. सै सिकंदर बशरात अली (42, रा.कवाडे नगर, भुसावळ) याच्या कंबरेला लावलेले पिस्टल तसेच नरेश देविदास सुरवाडे (29, रा.गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ) याच्याही कंबरेला पिस्टल तसेच पाच जिवंत काडतुसे मिळाल्याने पोलिसांनी शस्त्र, काडतूस तसेच आरोपींकडून विना क्रमांकाची मोटरसायकल असा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रशांत सोनार यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.