गावठी पिस्टल, अडीच किलो गांजासह दोघे जाळ्यात : मोहाडी पोलिसांची कारवाई

धुळे : धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस, चाकू, अडीच किलो गांजासह तीन लाख 82 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहाडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जीप चालक नदीम मोहम्मद शमीम सिद्दीकी (32, नवी मुंबई) व अस्लमखान अलियारखान पठाण (40, रा.मध्यप्रदेश) या दोघांना पथकाने अटक केली आहे.

महामार्गावर गोपनीय माहितीवरून कारवाई
मुंंबई-आग्रा महामार्गावरुन अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी पोलिसांनी महामार्गावर दरिया हॉटेलजवळ तात्पुरता चेकनाका उभारला. त्यावेळी धुळ्याकडून मुंबईकडे हुड नसलेली केशरी रंगाची ओपन जीप (क्र.एम.एच.16-7151) जात असताना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र चालकाने वाहन न थांबवल्याने टोलनाक्याजवळ जीप अडवण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यात 17 हजार 500 रुपये किंमतीचा अडीच किलो गांजा, 15 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल, 200 रुपये किंमतीचे एक जीवंत काडतूस, ट्रॅव्हलींग बॅग, 200 रुपये किंमतीचा चाकू असा तीन लाख 50 हजारांचा मुद्देमाल आढळला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, अशोक पायमुडे, किरण कोठावदे, प्रकाश जाधव, मुकेश मोरे, चेतन माळी, शाम काळे, प्रभाकर ब्राम्हणे, राहुल पाटील, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, धिरज गवते, राहूल गुंजाळ, जय चौधरी यांच्या पथकाने केली.