गावठी पिस्टल , जिवंत काडतुसासह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

 

यावल। यावल पोलिसांनी गोपनीय माहितीवरून यावल-फैजपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ 21 वर्षीय तरुणाला गावठी पिस्टलासह एक जिवंत काडतुस पकडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सुमित युवराज घारू (21, रा.श्रीराम नगर, यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, नेताजी वंजारी, हेड कॉन्स्टेबल असलम खान पठाण, पोलिस कॉस्टेबल सुशील घुगे, भूषण चव्हाण, रोहिल गणेश, निलेश वाघ, राहुल चौधरी, जगन पाटील आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई

श्रीराम नगरातील रहिवासी असलेल्या सुमित घारू याच्याकडे पिस्टल असल्याची गोपनीय माहिती यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. संशयीत सुमित घारु यास येथील यावल-फैजपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या हॉटेल अंजलीजवळ आल्यानंतर पोलिस पथकाने ताब्यात घेतले. अंगझडतीत संशयीताकडे 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा (पिस्टल) तसेच एक जिवंत काडतूस तसेच पंचेचाळीस हजार रुपये किंमतीचा मोबाइल, व दहा हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल तसेच 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.पी.1875) जप्त करण्यात आली. संशयीत आरोपी सुमीत घारू विरूद्ध कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीनुसार आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.